A marriage ceremony creates an ideal for the society : लग्नामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बिरसा मुंडांच्या प्रतिमा
Wardha मनुष्याच्या जीवनात लग्नसोहळा हा अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येक युवक, युवती या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. सोबतच आई-वडिलांसाठीसुद्धा हा दिलासादायक क्षण असतो. दिवसेंदिवस लग्नाच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला आहे. रूढी, परंपरेला फाटा देत वेगवेगळ्या पद्धतीने विवाह सोहळे पार पाडले जात आहेत. परंपरेला फाटा देऊन समाजात आदर्श निर्माण करणारा एक विवाह अलीकडेच पार पडला.
‘परिवर्तन निसर्गाचा नियम’ आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अवाढव्य खर्च करून विवाह सोहळे पार पाडले जातात. पण काही वैचारिक लोक आजही पैशांचा अपव्यय न करता अल्पप्रमाणात खर्च करून साध्या पद्धतीने विवाह सोहळे उरकवितात. याची प्रचिती पढेगाव येथे आली.
India-England One Day Match : क्रिकेट सामन्यासाठी उशिरापर्यंत धावणार मेट्रो!
पढेगाव येथील पंडित कोकाटे यांचा मुलगा शुभम व सालोड येथील सुरेश कोराम यांची कन्या रिना यांचा विवाह होता. या सोहळ्यात ना अंतरपाट, मंगलाष्टके, ना अक्षतांची उधळण होती. कारण हा विवाह अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष गजेंद्र सूरकार यांच्या पुढाकाराने महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने पढेगाव येथील बिरसा मुंडा पुतळ्याजवळ पार पडला.
बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा ठेवून त्यांचे पूजन करुन अक्षतांऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. याशिवाय कोणताही विधी न करता गजेंद्र सूरकार यांनी नवदाम्पत्याना सप्तपदीची शपथ दिली. यावेळी आसमंत स्नेहालयाचे संचालक शिवाजी चौधरी यांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक पद्धतीने विवाह का करावा, याचे महत्त्व पटवून दिले. या सोहळ्याला श्याम शंभरकर, माजी उपसरपंच नरेंद्र पहाडे, नरेश पंधराम, किसना कुडमथे, राजेंद्र डायगवाणे यांची उपस्थिती होती.
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने विवाह केल्यास वेळेसह पैशांचीही खूप मोठी बचत होते. याशिवाय आई-वडील आपल्या लग्न जुळलेल्या मुला-मुलींना घेऊन आले तर रुपयाचा खर्च न करता आमच्या सभागृहातही लग्न लावून दिले जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील ६७ लग्न लावून दिले आहेत, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष गजेंद्र सूरकार यांनी दिली.