Accounts and Treasury Department Sports Festival concludes : लेखा व कोषागारे विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धांचा समारोप
Nagpur शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नियमितपणे विविध क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांत सांघिक भावना निर्माण होते. एवढेच नव्हे तर मैदानी खेळांनी, सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभागाने दैनंदिन कामाचा ताण दूर होण्यासही मदत होते, असं आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी म्हटलं.
लेखा व कोषागारे संचालनालय तसेच स्थानिक निधी लेखापरीक्षा कर्मचारी कल्याण समिती यांच्या वतीने कला व क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. VNIT च्या मैदानावर हे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. समारोपप्रसंगी लेखा व कोषागार संचालक दिपाली देशपांडे, स्थानिक निधी लेखा परीक्षा मुंबईचे संचालक निलेश राजुरकर, वनामतीच्या संचालक सुवर्णा पांडे यांची उपस्थिती होती.
शरीर स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. सर्वांनी विविध माध्यमांतून आपले छंद पूर्ण करावे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. त्यासोबत मनालादेखील निरोगी करण्यामध्ये खेळाची खूप मोठी भूमिका असते. सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून सहभागाचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होत आहे, असंही ठाकरे म्हणाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध कला व क्रीडा स्पर्धांमध्ये राज्यभरातील लेखा व कोषागारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
गायन स्पर्धेत महिला (एकल) या गटात श्रृती वेपेकर या विजेता ठरल्या. तर पुनम कदम उपविजेता ठरल्या. तसेच पुरूष (एकल) मध्ये सुमेध खानवीस विजेता ठरले. तर सतीश पारधी उपविजेता ठरले. युगल गायनामध्ये सुमेध कांबळे व संध्या ढोणे ही जोडी विजेता ठरली. अर्चना पुरणिक व अंकूश नलावडे ही जोडी उपविजेता ठरली. समुह नृत्यमध्ये कोकण विभाग विजेता तर अमरावती विभाग उपविजेता ठरला.