My name is recommended to the High Command for State president : विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता
Nagpur विधानसभेतील पराभवानंतर आता काँग्रेसकडून महाराष्ट्रातील संघटनेत बदल करण्यात येत आहे. नाना पटोले यांच्या जागेवर काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष नेमण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केला आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांनी माझ्या नावाची हायकमांडकडे शिफारस केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
वडेट्टीवार यांच्या या दाव्यामुळे काँग्रेस वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वडेट्टीवार गुरुवारी नागपुरात बोलत होते. अनेकांनी माझ्या नावाची हायकमांडकडे शिफारस केल्याची माझ्याकडे माहिती आहे. मी स्वत: जाऊन मला प्रदेशाध्यक्ष बनवा असे म्हटलेले नाही. कुणालाही प्रदेशाध्यक्ष केले तर चालेल. मात्र हायकमांडने लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही केली आहे, असं ते म्हणाले.
आजवर मला जी जबाबदारी मिळाली आहे ती मी पार पाडत आलो आहे. जर मला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी ती पार पाडली असती. असे वडेट्टीवार म्हणाले. या वक्तव्यातून वडेट्टीवार यांनी आपण या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते अशा चर्चांनादेखील उत आला आहे. सपकाळ हे सचिन राव व मीनाक्षी नटराजन यांच्या जवळचे मानले जातात. हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
काँग्रेस नेतृत्वाला असे सूचित करण्यात आले की, ज्या नेत्याचा कोणताही व्यवसाय नाही अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष करावे. तिसऱ्यांदा आमदार झालेले विश्वजित कदम यांना काँग्रेस नेतृत्व विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यावर विचार करत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांचा राजीनामा स्वीकारला आहे. अशा स्थितीत आता सपकाळ यांना संधी मिळते की वडेट्टीवार यांच्याकडे हायकमांड जबाबदारी देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.