Rasta Roko to start Shakuntala train : ट्रेन सुरू करण्यासाठी 23 मार्चला अचलपुरात रास्ता रोको आंदोलन
Amravati गेल्या सात वर्षांपासून बंद असलेल्या शकुंतला ट्रेनला पुन्हा सुरू करण्यासाठी आणि ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या शकुंतला बचाव सत्याग्रह समितीने 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त अचलपुर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
ब्रिटिशकालीन वारसा असलेली शकुंतला ट्रेन अचलपुर ते मुर्तिजापूरदरम्यान धावत होती. मात्र, अचानक तिचे संचालन बंद करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून या मार्गाच्या ब्रॉडगेज रूपांतरासाठी सातत्याने मागणी होत आहे. हा रेल्वेमार्ग विकसित झाल्यास परिसराचा आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकास वेगाने होईल.
या मागणीसाठी आतापर्यंत ३० हून अधिक आंदोलने करण्यात आली असून, राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वे मंत्री आणि राज्य सरकारकडे वारंवार निवेदने पाठवण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकारने 21 मार्चपर्यंत योग्य तो निर्णय न घेतल्यास, 23 मार्च रोजी अचलपुरातील चांदूर नाका, अमरावती मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शकुंतला बचाव सत्याग्रह समितीने दिला आहे.
Indian Railways : भारतीय रेल्वेने गाठला महिला सशक्तीकरणाचा नवा टप्पा
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, शांतिपूर्ण मार्गाने अनेक आंदोलने करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आता हे आंदोलन अधिक व्यापक होईल. स्थानिक नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनीही याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शकुंतला ट्रेन केवळ प्रवाशांसाठी वाहतूक साधन नाही, तर हा मार्ग हजारो लोकांच्या जीवनमानाशी जोडलेला आहे. या मार्गाच्या पुनर्बांधणीमुळे व्यवसाय, शिक्षण, उद्योग आणि पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे हा मुद्दा संपूर्ण विदर्भाच्या विकासाशी संबंधित असून, सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.