Fraud of 21 lakhs by selling Bhoodan land : २१ लाखांनी फसवणूक; मोठे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय
Yavatmal भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीच्या शेतजमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून नागपूर येथील व्यक्तीला २१ लाख ३४ हजार रुपयांनी गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे.
रमेश उखर्डा म्हसाये (रा. छत्रपतीनगर, नागपूर) यांना या प्रकरणातील मध्यस्थ राजेंद्र नत्थुजी चिकटे आणि देवीदास वामन आंबेकर (दोघेही रा. आनंदवन चौक, वरोरा) यांनी झरी तालुक्यातील सुर्ला येथील जवळपास अडीच एकर शेताचा सौदा करून दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज देवराव दानव (रा. एकार्जुना, ता. वरोरा) आणि प्रवीण गणपत डाहुले (रा. पिसदुरा, ता. वरोरा) यांच्या सामायिक नावाने असलेल्या सातबाराच्या आधारे २६ नोव्हेंबर २०१९ मध्ये ही खरेदी करण्यात आली.
त्या मोबदल्यात रमेश म्हसाये यांच्याकडून शेताचे मूल्य म्हणून २१ लाख ३४ हजार रुपये घेण्यात आले. खरेदीखत झाल्यानंतर याची नोंदणी करण्यासाठी हे प्रकरण महसूल विभागाकडे गेल्यानंतर ही जमीन भूदान यज्ञ मंडळ, नागपूरच्या मालकीची असून यातील आरोपी मनोज दानव, प्रवीण डाहुले यांना विक्री करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी माहिती रमेश म्हसाये यांना मिळाली.
दोघांकडून भूदानची जमीन कमी दरात विक्रीचे आमिष देत गंडविल्या जात आहे, हे उघड झाले. त्यानंतर रमेश म्हसाये यांनी तक्रार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. कागदपत्रांची जुळवाजुळव करीत प्रकरण पोलिसात पोहोचविले. २६ नोव्हेंबर २०१९ मध्ये ही खरेदी करण्यात आली. म्हसाये यांनी आपली फसगत झाली असून, आरोपीकडे पैसे परत करण्याची मागणी केली; मात्र आरोपी उडवाउडवीची उत्तर देत होते.
शेवटी रमेश म्हसाये यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर २१ मार्चला चारही आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल झाले आहेत. पुढील तपास ठाणेदार संजय सोलंकी यांच्या मार्गदर्शनात जमादार दिग्विजय किनाके करीत आहेत. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याचे बोलले जात आहे. ही जमीन भूदान यज्ञ मंडळ नागपूरच्या मालकीची असताना या जमिनीचा सातबारा आरोपीच्या नावाने कसा तयार झाला. तो कोणी करून दिला आणि खोट्या सातबाराच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयाने ही खरेदी कशी केली, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Yavatmal Zilla Parishad : प्रभार न सोपविता, कॅफो आठवडाभर सुटीवर!
यात मोठे रॅकेट सक्रिय असून खोट्या खरेदी-विक्रीची अनेक प्रकरणे तपासात पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविल्यास याची पाळेमुळे राज्यभर पसरल्याचे उघड होऊ शकते. यामुळे इतरांची होणारी फसवणूकही थांबविता येऊ शकते.