False cases filed against Azad Hind activists in Buldhana : आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल
Buldhana : जिल्ह्यातील अवैध धंदे, रेती तस्करी आणि अन्य गैरप्रकार तातडीने थांबवावेत, तसेच गहाळ झालेल्या मुली आणि महिलांचा शोध घ्यावा, या मागण्यांसाठी आझाद हिंद संघटनेने 23 ते 26 मार्चदरम्यान आमरण उपोषण आंदोलन केले. मात्र, जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुले 26 मार्च रोजी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
आझाद हिंद संघटनेच्या या आंदोलनाची दखल पोलीस महासंचालक, मुंबई यांनी घेतली. यासंदर्भात कार्यालयीन चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक (IGP) यांनी आझाद हिंदचे ॲड. सतीशचंद्र रोठे, पंचफुला गवई, सुरेखा निकाळजे, निर्मला रोठे आदी पदाधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले.
कर्तव्यदक्ष पोलिसांकडून आंदोलकांवर गुन्हे दाखल..
गेल्या वर्षीच्या आंदोलनाची नोंद घेत 1 एप्रिल रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आझाद हिंद संघटनेचे ॲड. सतीशचंद्र रोठे आणि कार्यकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा क्रमांक 883/2024 नुसार कलम 135, तसेच 26 एप्रिल रोजी गुन्हा क्रमांक 300/2025 नुसार कलम 126(2) आणि 5(3) बीएनएस अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे समजते.
Buldhana District Collector : जिल्हाधिकारी व भूसंपादन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्ती टळली !
गृह विभागाच्या कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्ष..
आझाद हिंदच्या आंदोलनानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर काही प्रमाणात आळा बसला असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी संघटनेने मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे. या तक्रारींवर काय निर्णय घेतला जातो आणि पुढील कारवाई काय होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
सहा दिवसांत 300 अनधिकृत व्यवसायांवर कारवाई..
आझाद हिंदच्या आंदोलनानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मार्गदर्शनाखाली 300 अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करून 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
आंदोलक आणि पत्रकारांवर पोलिसांचे दबाव तंत्र..
आंदोलनादरम्यान पोलिस अधीक्षकांचा निषेध नोंदवून काळे झेंडे दाखवल्याच्या घटनेनंतर, काही पत्रकारांचे जबाब नोंदविण्याचा दबाव प्रशासनाकडून टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, आझाद हिंदच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, धमक्या देणे आणि दबाव तंत्राचा वापर करणे यांसारख्या घटना घडत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.