Breaking

Nitin Gadkari : इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती ! गडकरींनी ऐकवली कविता..

Nitin Gadkari said that being a BJP worker is our caste and loyalty : भाजपचा कार्यकर्ता हीच आपली जात आणि निष्ठा आहे

Nagpur : भारतीय जनता पक्षाचा काल स्थापना दिवस होता. यावेळी नागपुरात पक्षाच्या कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरींनी कार्यालयाला घराची उपमा देऊन एक कविता ऐकवली.

गडकरी म्हणाले, चार पाच दिवसांपूर्वी श्रीधर फडके यांनी वयाची ७५ वर्ष पूर्ण केली. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी गेले होतो. कवी लिमयेसुद्धा या कार्यक्रमात होते. त्यांनी घरावर सुंदर कविता केली. ही कविता प्रत्येकाने आपल्या घरात फ्रेम करून लावली पाहिजे. यावेळी गडकरींनी कविता ऐकवली.

घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी

कार्यकर्ते आपला परिवार आहे..
आपल्या कार्यालयाची अतिशय सुंदर इमारत तयार होणार आहे. इमारतीचा आनंद कशात आहे, याचा विचार करण्यायेवढे आपण सुज्ञ आहोत. कार्यकर्ते आपला परिवार आहे, हे समजून नेत्यांनी वागलं पाहिजे. आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो, तेवढंच प्रेम कार्यकर्त्यांवर केलं पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

MLA Ravi Rana : नव्या एसटी बसच्या स्वागतासाठी आमदारच बनले चालक!

गिरीष व्यास यांचे परिश्रम
गडकरी म्हणाले, या कार्यालयाच्या जागेत अनेक मनोरंजक गोष्टी आहेत. ही जमीन घेताना आपण कम्यूनीस्ट आणि हिंदू महासभेचेही कार्यालय घेतले. मी वर्धन साहेबांशी बोलून त्याची किमत दिली आहे. या जागेत किरायेदार होते. अनेक भानगडी होत्या. त्या मिटवण्यामध्ये गिरीष व्यास यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी एक जागा बच्छराज व्यास स्मृती ट्रस्टसाठी घेतली होती. नंतर त्यांनी ती पक्षाला दिली. किरायेदारांना येथून काढण्यासाठी व्यास यांनी खूप परिश्रम घेतले.

Samruddhi Mahamarg : बुलढाणा, चिखलीला ‘समृद्धी’शी जोडणार!

जातीचे सेल कामाचे नाहीत..
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना सांगितलं की, मी ज्या चुका केल्या, त्या तुम्हीही करता आहात. मला झळ बसली तेव्हा मी सुधरलो. तुम्हाला ती झळ बसल्यावरच तुमच्या लक्षात येईल. मी जातीचे सेल उघडले. लोकांनी सांगितले की नको करू. पण मी ऐकलं नाही. सेल करून जाती जुळल्या नाही. जातीचे जे नेते आपल्यात आले त्यांना त्यांच्या जातीत कुणी विचारत नव्हते. हाच अनुभव बावनकुळेंनादेखील येईल. बावनकुळेना ५० जातींच्या लोकांचे पत्र येतील, तेव्हा त्यांना कळेल. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आपण जातीने मोठे नाही. भाजपचा कार्यकर्ता हीच आपली जात आणि निष्ठा आहे. राष्ट्राचा विकास हेच आपले उद्दीष्ट आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. या कार्यालयासाठी मी २५ लाख रुपयांचा समर्पण निधी देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.