Mental torture by District President Kazi : अनुजा सावळेंचा गंभीर आरोप; पक्षविरोधी कारवाईचा आरोप फेटाळला
Buldhana : राष्ट्रवादी काँग्रेसमधून (अजित पवार गट) निष्कासित झालेल्या जिल्हाध्यक्ष अनुजा सावळे यांनी पक्षाने केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी गेल्या दोन वर्षांपासून त्यांना मानसिक त्रास देत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत सावळे यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, एका महिलेला पदावरून हटवण्यासाठी काझींना दोन वर्षे अजित पवार यांच्या घराचे उंबरठे झिजवावे लागले. त्यांनी महिलेला अपमानित केल्याचा आरोप करत, काझींनी पक्षाच्या गटबाजीला चालना दिल्याचेही सांगितले.
सावळे यांनी दावा केला की, ॲड. काझी गेल्या १५ वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर आहेत. त्यांनी पक्षसंघटना फक्त सिंदखेड राजापुरती मर्यादित ठेवली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती अत्यंत कमकुवत झाली आहे. त्याचबरोबर, प्रदेश उपाध्यक्ष टी. डी. अंभोरे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी निवडणुकीत काम केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, मनोज बोरकर यांनीही डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारासाठी कार्य केले असल्याचा दावा केला.
सावळे यांनी आरोप केला की, जिल्हाध्यक्ष ॲड. काझी पक्षाच्या अधिकृत कार्यक्रमांना अडथळा आणण्यासाठी गावागावांत फोन करून गोंधळ निर्माण करतात. याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे दोन वेळा तक्रार दाखल केली होती.
Dr. Pankaj Bhoyar : PDKV च्या सहकार्याने शेतकरी आत्महत्या रोखणार!
सावळे यांनी स्पष्ट केले की, पक्षाकडून आपल्यावर अन्याय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाध्यक्ष अजित पवार यांना भेटून आपली भूमिका स्पष्ट करणार आहोत. सावळे यांच्या आरोपांमुळे जिल्हा पातळीवरील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. आता पक्षश्रेष्ठी या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहतात आणि यावर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.