Chandrashekhar Bawankule used abusive language during phone call : महसूल मंत्र्यांचा फोन; पण विचारपूस करताना दादागिरीचा सूर
Amravati “सरकारने सरकारचे काम करावे, आम्ही आमचे करू,” असे म्हणत बच्चू कडू यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषेवर तीव्र आक्षेप घेतला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन करून विचारपूस तर केली, पण त्यांची भाषा दादागिरीची आणि दमदाटीची होती, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
“जमत असेल तर उपोषण सोडा, नाहीतर राहू द्या. ही भाषा आहे का?” असे म्हणत कडूंनी संताप व्यक्त केला. “कॉल रेकॉर्ड असता तर ऐकवले असते,” असेही ते म्हणाले. शेतकरी, दिव्यांग, विधवा महिला आणि वंचित घटकांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोझरी (अमरावती) येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
Bacchu Kadu Strike : शरद पवारांचा फोन, मनोज जरांगेची भेट, अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस
बच्चू कडू यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग व विधवा महिलांसाठी दरमहा ६ हजार रुपयांचे मानधन आणि वंचित घटकांचे प्रश्न यासाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाने राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. बावनकुळे यांनी कडूंना फोन करून चर्चा तर केली. मात्र, या संभाषणामुळे कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Bacchu Kadu : शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला
कडू पुढे म्हणाले, “बावनकुळे आमच्या भेटीला आले नाहीत याचे दुःख नाही. पण फोनवर बोलतानाचा त्यांचा सुर चुकीचा होता. त्यांची भाषा दादागिरीची व दमदाटीची होती. आम्ही ती सहन करणार नाही.’ लाडक्या बहिणीच्या वेळी नियम बाजूला ठेवले, आता मात्र अपात्र ठरवता? हे चालणार नाही, असंही ते म्हणाले.
बावनकुळे यांनी फेटाळले आरोप
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी पूर्ण आदराने संवाद साधला. मुंबईत बैठक घेऊ, असे सांगितले. त्यांच्या मागण्या समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना पाठवले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. “कडूंनी चुकीच्या पद्धतीने माझ्यावर टीका केली. आंदोलनकर्त्यांची आम्ही काळजी घेऊ व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच बैठक घेऊ,” असंही बावनकुळे यांनी नमूद केलं.