Placards put up on the road against MP, MLA for poor road condition : रस्त्यावरच लावला फलक, दर्यापुरात राजकीय वातावरण तापले
Amravati दर्यापूर येथील सामाजिक कार्यकर्ते ओम राणे यांनी शहरातील हिंगणी रस्त्याची दुरवस्था लक्षात घेत खासदार बळवंत वानखडे आणि आमदार गजानन लवटे यांच्यावर अनोख्या पद्धतीने निशाणा साधला आहे. रस्त्याच्या संपूर्ण भागावर जाहिरात फलक लावून “खासदार साहेब, आमदार साहेब, बांधकामाचे काय झाले? उत्तर द्या!” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे हे फलक शहरात चर्चेचा विषय ठरले आहेत. या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.
दर्यापुरातील सांगळुदकर नगर ते हिंगणी रस्त्यावरील खड्ड्यांनी नागरिक हैराण झाले असून, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. नागरिक नियमितपणे कर भरत असले, तरी मुलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळेच ओम राणे यांनी फलक उभारून लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारले आहेत.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय भूसंपादन नाहीच!
शहरातील सांगळुदकर नगर, जागृती कॉलनी, पंजाबराव कॉलनी, अवधूत नगर, शिक्षक कॉलनी, दत्त नगर, विहान मंगल कार्यालय परिसर, ड्रीमलँड सिटी आणि अन्य भागांमध्ये अद्यापही पायाभूत सुविधा पुरवण्यात नगरपरिषद अपयशी ठरली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे. त्यांनी आमदार लवटे आणि खासदार वानखडे यांच्याविरोधात रोष व्यक्त केला आहे. या रस्त्यावरील समस्यांबाबत यापूर्वी अनेक वृत्तपत्रांतून वारंवार वार्ता प्रसिद्ध झाल्या आहेत.
अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधींना निवेदने दिली. मात्र, कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. आता पावसाळा तोंडावर आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचते. त्यामुळे डास, किडे आणि सरपटणारे प्राणी घरात घुसण्याची वेळ नागरिकांवर येते. त्यामुळे आरोग्य आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Mumbai Municipal Corporation : आम्ही मुंबईचे रस्ते साफ केले, तर काहींनी तिजोरी !
या पार्श्वभूमीवर ओम राणे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात, “जर प्रशासनाने त्वरित रस्त्याचे बांधकाम सुरू केले नाही, तर तीव्र जन आंदोलन छेडले जाईल आणि बेमुदत उपोषणही करण्यात येईल,” असा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच परिसरातील नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.