GST office files sold for liquor The government is conducting a search : अट्टल दारूड्या लिपिकाचा प्रताप, सरकार दरबारी शोधाशोध ?
Nagpur : दारूचे व्यसन माणसाला कुठल्या स्तरावर घेऊन जाईल, हे सांगता येत नाही. दारू पिण्यासाठी दारूडे काय काय करतील याचा नेम नाही. अगदी दारू पिण्या – पाजण्याच्या कारणावरून खून झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. दारू पिण्यासाठी उधारी करणे, घरातील वस्तू चोरणे, दागीने विकणे, मारहाण करणे या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. परवा परवा बारमध्ये बसून सरकारी फाईल्सवर सह्या करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या वृत्ताची शाई वाळते न वाळते तोच आता यापेक्षाही धक्कादायक आणि हादरवून सोडणारी घटना नागपुरात घडली आहे. दारूड्या सरकारी लिपीकाने दारू पिण्यासाठी पैसै नसल्यामुळे चक्क सरकारी फाईल्स विकून टाकल्या.
नागपूर CGST कार्यालयातील मोहित गुंड नामक लिपीकाने दारूच्या व्यसनापायी GST कार्यालयातील फाईल्स भंगारमध्ये विकल्या. सुमारे ५०० किलो वजनाच्या फाईल्स भंगारवाल्याला विकण्यात आल्या. CGST कार्यालयातून फाईल्स गायब झाल्याची बाब जेव्हा लक्षात आली, तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर हा प्रकार उघडकीस आला. नागपुरातील CGST म्हणजेच Central Goods and Services Tax या कार्यालयात हा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे. मोहित गुंड हा लिपीक ऑटो घेऊन कार्यालयात आला. त्याने ५०० किलो वजनाच्या फाईल्स ऑटोमध्ये टाकल्या आणि विकायला घेऊन गेला.
मोहित गुंड हा इंदोर CGST कार्यालयात लिपीक होता. वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्याची नियुक्ती झाली. दारू पिऊन कार्यालयात येणे, गैरवर्तन करणे या कारणांमुळे त्याची बदली नागपुरात करण्यात आली. नागपूरच्या CGST झोनल कार्यालयातही तो अनेक वेळा गैरहजर राहात होता. गेल्या आठवड्यात त्याने कार्यालयातून सुमारे ५०० किलो वजनाच्या फाईल्स ऑटोत भरून नेल्या आणि त्या भंगारवाल्याला पाच हजार रुपयांत विकल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पण अद्यापही या प्रकरणाची तक्रार पोलिसांत न झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सीसीटीव्हीचे फुटेज असतानाही हा पुरावा पोलिसांना का दिला नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Chandrashekhar Bawankule : नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी सीएसआरचा निधी !
ज्या भंगारवाल्याला मोहित गुंड याने फाईल्स विकल्या होत्या, त्याला पाच हजार रुपये देऊन अधिकाऱ्यांनी या फाईल्स परत आणल्या आहेत. पण या प्रकरणात अद्याप पोलिस तक्रार का करण्यात आली नाही, गुप्तता का बाळगण्यात येत आहे, हे कळायला मार्ग नाही. नागपुरातील मनीष नगरमधील प्रसिद्ध बारमध्ये शासकीय फाईल्सवर सह्या करण्याच्या प्रकरणात पोलिस चौकशी करत आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. पण CGST कार्यालयातील फाईल्स भंगारमध्ये विकण्याच्या प्रकाराची तक्रार अद्याप पोलिसांत का करण्यात आली नाही, हा प्रश्न अजूनही कायम आहे.