Agreement with Google for road safety : गुगलसोबत झाला करार; अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लान
राज्यामध्ये रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मास्टर प्लान आखला आहे. आता एआयच्या AI मदतीने रस्ते सुरक्षा अभियान राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे यासाठी गुगलसोबत करार झाला आहे. त्यामुळे भविष्यात अपघातांची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील तीन वर्षांत नवीन ई.व्ही. पॉलिसी EV घोषित करण्यात येणार आहे. या बरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा AI वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा, असेही स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. घाटांमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांची दखलही मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या आहेत.
सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, सामाजिक न्याय मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आदींची उपस्थिती होती.
बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब येणार
राज्यात परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. यावर अंमलबजावणी झाल्यास मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराचे साधन तर निर्माण होणारच आहे, शिवाय खासगी वाहनांची गर्दी देखील रस्त्यांवरून कमी होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास प्रशासनाला आहे.
शासकीय वाहने भंगारात काढा
जुन्या 13 हजार शासकीय वाहनांना भंगारात काढण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात टाकून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. बसविण्यात यावे. जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.
वडसा-गडचिरोली रेल्वे प्रकल्प
टॅक्सी, ऑटो, शहर बस सेवेच्या तिकीट दरांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वडसा-गडचिरोली Vadsa Gadchiroli तसेच सोलापूर-उस्मानाबाद Solapur Usmanabad येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी बंदरे तसेच विमानतळ प्राधिकरण आदिबाबतची चर्चा करण्यात आली.