Expulsion of four Youth Congress leaders : अंतर्गत वाद अधिकच चिघळला; आगामी निवडणुकीसाठी धोक्याची घंटा
Nagpur युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद व त्यातून ६० पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या उचलबांगडीवरून राजकारण तापले असतानाच आणखी एक वादग्रस्त निर्णय समोर आला आहे. पदमुक्त करण्यात आलेल्यांपैकी चार जणांची युवक काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. लोकसभा-विधानसभा निवडणूकीत या चारही जणांनी पक्षाचे काम केले होते व या कारवाईमुळे युवक काँग्रेस व काँग्रेसमध्ये चुकीचा संदेश गेल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात भूमिका घेणे चौघांनाही भोवल्याचे सांगण्यात येत आहे.
युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, सरचिटणीस, सचिव अक्षय हेटे व मिथिलेश कन्हेरे अशी हकालपट्टी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय छिकारा यांनी पत्र काढले आहे. या चौघांनीही युवक काँग्रेसची शिस्त व तत्व यांचा भंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन मागील पंधरवड्यात युवक काँग्रेसतर्फे करण्यात आले होते.
मात्र ते आंदोलन फारसे यशस्वी झाले नाही. त्याचे खापर ६० पदाधिकाऱ्यांवर फोडत त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. यात शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे यांच्यासोबत या चौघांचाही समावेश होता. यानंतर युवक काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली. कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनाच तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय प्रभारी यांच्याकडे केली होती.
CM Devendra Fadnavis : अराजकीय ताकदीच्या विरोधात ताकदीने उभे राहा
या तक्रारीची शुक्रवारी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावेरू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दखल घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारा वेळ विचारात घेता निवडणूक जाहीर होईपर्यंत कार्यकारी अध्यक्ष म्हणून शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोरे यांना शनिवारी तातडीने दिल्लीत बोलावून पदभार स्वीकारण्याचा आदेश देण्यात आला. यामुळे राऊत गट नाराज झाला. त्यातूनच या चौघांचीही हकालपट्टी झाल्याची चर्चा आहे