Breaking

Search operation for Bangladeshi infiltrators संशयित बंगाली कारागिरांची चौकशी !

Interrogation of suspected Bengali artisans in Amravati : अमरावतीत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची शोध मोहीम सुरू

Amravati महाराष्ट्रातील बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्या आहेत. या अनुषंगाने शहर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली संशयित बंगाली मजुरांची तपासणी मोहीम सुरू झाली आहे.

गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार, शहरातील व्यावसायिक संकुलं, आस्थापनं, कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांपैकी कोणी बांगलादेशी नागरिक आहेत का. हे शोधले जात आहे. त्यांच्या आधार कार्डच्या वैधतेची पडताळणी तसेच बायोमेट्रिक तपासणी केली जात आहे.

गुरुवारी, रहाटगाव रोडवरील अंबा बिझनेस पार्कमधील रेडिमेड कापड निर्मितीच्या विविध कारखान्यांत तपासणी करण्यात आली. क्राइम युनिट दोनचे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे १५० बंगाली मजुरांची कसून चौकशी केली. तपासणीसाठी नांदगाव पेठ रोडवरील व्यावसायिक संकुलं, दोन्ही एमआयडीसी क्षेत्र, तसेच अन्सारनगर व लालखडी भागांत मोहीम राबविण्याचा नियोजन आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २२ जानेवारी रोजी आरोप केला की, अकोला जिल्ह्यात सुमारे १५,८४७ बांगलादेशींना बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे जन्म दाखले दिले गेले आहेत. याशिवाय, अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून १२०० लोकांना अशाच पद्धतीने बनावट कागदपत्रे पुरविल्याचा आरोप आहे. याआधी, डिसेंबर २०२४ मध्ये शिवसेनेचे (उठाबा) अमरावती जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनीही अमरावतीतील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात कडक तपासणी करण्याची मागणी केली होती.

अभिनेता सैफ अलीवर हल्ला करणारा व्यक्ती बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारला अशा घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना पत्र पाठविले आहे.

खबरदारी म्हणून संशयितांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील व्यावसायिक संकुलं आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या बंगाली मजुरांची कागदपत्रांची वैधता तपासली जात आहे, असे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले.