Fadanavis sensational statement regarding Uddhav Thackeray : उद्धव ठाकरें संदर्भात फडणवीसांचं खळबळजनक विधान
Mumbai : एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षांवर गदा आणली नसती, तर त्यांनी उठाव केलाच नसता,असं खळबळजनक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. एक टीव्ही शो मधील मुलाखत वजा कार्यक्रमात बोलताना त्यांनी 2022 मधील राजकीय उलथा पालथीचं तपशीलवार विश्लेषण केलं.
फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावान शिवसैनिक होते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती झाल्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते नाराज होते. याशिवाय, त्यांच्या खात्यांच्या बैठका आदित्य ठाकरे घेऊ लागले, त्यांच्या अधिकारांवर गदा येऊ लागली आणि हे लक्षात आल्यावर त्यांनी उठावाचा निर्णय घेतला.
विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं, तर आतमध्ये काँग्रेसकडून आलेला सल्लागार आमदारांना मतदानाचं मार्गदर्शन करत होता. तोच क्षण शिंदेंच्या सहनशक्तीचा शेवट होता. शिंदे उठाव करत महाराष्ट्राच्या सीमेबाहेर गेले तेव्हा त्यांनी मला फोन केला. मी त्यांना पाठिंबा दर्शवला. उठावाच्या पहिल्या दिवसापासूनच हे ठरलं होतं की शिंदेच मुख्यमंत्री होतील.
मी उपमुख्यमंत्री होणार नव्हतो, पण पक्षाच्या आदेशावर मी सरकारमध्ये सहभागी झालो. असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी जी पक्षातील यंत्रणा तयार केली होती, त्याच्याच विरोधात आमदार वैतागले होते. त्यांनी आमच्यावर आरोप करण्याऐवजी या अंतर्गत विसंवादाची कारणं शोधायला हवीत,अशी टीका पण फडणवीसांनी केली.
______