Signs of a political earthquake, a big change in politics : राजकीय भूकंपाची चाहूल, राजकारणात मोठा बदल?
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये महायुती सरकारमधील एकूण आठ मंत्र्यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या या तर्कवितरका वरून हा सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य फेरबदलात भाजपचे दोन, शिंदे गटाचे चार आणि अजित पवार गटाचे दोन मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी अनेक मंत्र्यांवर वादग्रस्त वक्तव्ये, अकार्यक्षम कार्यप्रदर्शन आणि गैरशिस्तीमुळे टीका झाली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती, हेही यात एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे.
Jharkhand liquor scam ; झारखंड दारू घोटाळ्यात शिंदेंच्या निकटवर्तीयाची अटक !
शिंदे गटातून वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. यापैकी काही मंत्र्यांवर सातत्याने वादग्रस्त विधानं आणि पक्षांतर्गत नाराजीचे आरोप आहेत. अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणानंतरचा राजीनामा तर सर्वांनाच माहीत आहे. आता माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरही टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. त्याचप्रमाणे नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावं लागू शकतं.
भाजपकडून मंत्रिमंडळात असलेल्या नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांच्यावरही वादग्रस्त वर्तनामुळे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेक वेळा पक्षाची प्रतिमा डागाळली गेल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे या दोघांनाही मंत्रिमंडळातून बाहेर करण्यात येण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन यांनाही पक्षहितासाठी मंत्रिपद नाकारण्याचा पर्याय सुचवण्यात येईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व हालचालींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं असा अंदाज व्यक्त होत आहे.
या संभाव्य फेरबदलांमुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.