Chief Minister’s seven-point program: District Collector reviews the system : मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कार्यक्रम : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला यंत्रणेचा आढावा
Wardha News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर होण्यासाठी अर्थात ईज ऑफ लिव्हिंगसाठी सात कलमी कृती कार्यक्रमाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू असलेल्या या कृती कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिल्या आहेत.
पुढील शंभर दिवसांत राबवायच्या सात कलमी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. राज्यात प्रशासनाला येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करावयाची कामे याबाबत या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत.
Backpacks on students’ backs : विद्यार्थ्यांच्या पाठीवर दहा किलोचे दप्तर !
विभागांनी सात कलमी कार्यक्रमाबाबत काय कार्यवाही केली, याबाबत १५ एप्रिल २०२५ रोजी आढावा घेतला जाणार आहे. आपल्या कार्यालयाचे संकेतस्थळ सुसज्ज करणे, माहिती अधिकार कायद्यानुसार मागितली जाईल, अशी सर्व माहिती अगोदरच संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, संकेतस्थळ सायबरदृष्ट्या सुरक्षित करणे, शासकीय कार्यालयांची स्वच्छता करणे, अनावश्यक कागदपत्रे काढून टाकणे ही कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशाही सूचना देण्यात आल्या.
दर शुक्रवारी कार्यालयात स्वच्छता मोहीम
नागरिकांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रत्येक विभागाने किमान दोन सुधारणा, नावीन्यपूर्ण उपक्रम आपल्या कार्यालयात राबवावेत. पुढील शंभर दिवसांत प्रलंबित कामांची संख्या शून्यावर आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. तालुका व जिल्हास्तरावरील सर्व अधिकारी लाभार्थ्यांशी, नागरिकांशी संवाद साधून योजनांच्या अंमलबजावणीविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घ्यावा. तसेच दर शुक्रवारी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून निरुपयोगी साहित्य, कागदपत्रांची विल्हेवाट लावावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
The birth rate of girls increased : जिल्ह्याला लक्ष्मी पावली, मुलींचा जन्मदर वाढला !
तालुकानिहाय घेणार शिबिर
जातप्रमाणपत्र, नझुल पट्टे वाटप, घरकुल मंजुरी, जन्मदाखला, प्रॉपर्टी कार्ड, जमीन मोजणी, फेरफार, पांदण रस्ते मोजमाप, वैयक्तिक लाभाच्या योजना, दस्त नोंदणी, भाग नकाशे, बांधकाम परवानगी देणे, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, तक्रारीचे निर्धारित वेळेत निवारण व संवाद भेट याबाबत सुलभ व्यवस्था निर्माण करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केल्या. नागरिकांसोबत सौजन्यपूर्ण व्यवहार करावा व नागरिकांची कामे निर्धारित वेळेत करावी. विविध प्रमाणपत्र व योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय शिबिर आयोजित करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या.
काय आहे मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कार्यक्रम ?
– विभाग, कार्यालयाची वेबसाइट अद्ययावत करा
– ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर काम करा
– शासकीय कार्यालयात स्वच्छता मोहीम राबवा
– नागरिकांच्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे निकाली काढा
– उद्योजकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या
– शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्प आणि योजनांच्या प्रकल्पांना भेटी द्याव्या
– शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या