Sarpanch who encroached on government land declared ineligible : मेरा खुर्दचे सरपंच अपात्र, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Buldhana चिखली तालुक्यातील मेरा खुर्द गावाचे सत्ताधारी सरपंच रमेश अवचार यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून गोडाऊन व दुकाने उभारल्याप्रकरणी मोठा दणका बसला आहे. अप्पर जिल्हाधिकारी मिलिंद खांदे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९६९ च्या कलम १४ (१)(ज-३) अंतर्गत त्यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवणारा निर्णय दिला असून, यामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणात ग्रामस्थ दिपक शिंगणे यांनी ९ महिन्यांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करत गंभीर आरोप केले होते. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार, सरपंच अवचार यांनी गट क्रमांक ३७ मधील एल-आकाराच्या शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे गोडाऊन व तीन गाळे उभारले. त्यातील दोन दुकाने ‘खेडेकर इलेक्ट्रिकल्स’ आणि ‘खेडेकर कृषी केंद्र’ यांना भाड्याने दिली, तर उर्वरित भाग स्वतः वापरात घेतला.
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता
याशिवाय एक गाळा ‘महा ई सेवा केंद्र’ म्हणूनही वापरण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व बांधकामे कोणतीही अधिकृत परवानगी न घेता केल्याचे आणि तलाठी व ग्रामसेवक यांच्या सहकार्याने कागदपत्रांची उघडपणे टाळाटाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले.
सुनावणीदरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यांनी तलाठीच्या रेकॉर्डमध्येही अतिक्रमण नोंद असल्याचे निदर्शनास आणले. तसेच सदर गट क्रमांकावरील खरेदीखत व इतर कागदपत्रांतूनही अतिक्रमणाचे पुरावे मिळाल्यामुळे सरपंच रमेश अवचार यांना सरपंच पदासाठी अनधिकृत आणि अपात्र ठरवण्यात आले.
Akola Airport : अकोला विमानतळाच्या विकासासाठी केंद्र सरकारचे सकारात्मक पाऊल
या निर्णयामुळे ग्रामपंचायत कारभारात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. स्थानिक राजकारणात ‘सत्तेचा दुरुपयोग करून जमीन हडपणारे’ हे नवेच चित्र उभे राहत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात तक्रारदार दिपक शिंगणे यांचे काम अॅड. डी. आर. सदार यांनी तर सरपंच रमेश अवचार यांची बाजू अॅड. अल्पेश ठाकरे यांनी मांडली.