Breaking

Minister Babasaheb Patil : थेट वावरात पोहोचले पालकमंत्री, नुकसानाची पाहणी

 

Guardian Minister visited the fields and inspected the damage : अवकाळी पावसाने घातले थैमान; शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

Gondia गोंदिया जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज सडक अर्जुनी तालुक्यातील राका, चिखली, मनेरी, कोकणा आणि खोबा या गावांना भेट देत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली.

अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील धानाचे पीक पूर्णपणे भिजून गेले असून, अनेक घरांवरील छप्परे उडाली, भिंती कोसळल्या. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी गावोगाव जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला.

यावेळी बोलताना पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, “राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रशासनाने या संदर्भात कोणतीही ढिलाई न करता तात्काळ सर्वेक्षण सुरू करावे व अहवाल सादर करावा,” असा स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिला.

Vidarbha Farmers : धानाचे पीक भिजले, संकट कोसळले, शेतकरी हवालदील!

यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर पिकांची झालेली हानी, विमा कंपन्यांकडून होणारी दिरंगाई, आणि मदतीच्या प्रक्रियेत होणाऱ्या अडचणींविषयी निवेदन दिले. मंत्री पाटील यांनी सर्व समस्या गांभीर्याने ऐकून घेत लवकरच मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन या संदर्भात ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाच्या आपत्कालीन पथकांनी गावागावात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

Caste wise census : जातिनिहाय जनगणना; राहुल गांधींचा मोठा विजय !

पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. “शासनाकडून वेळेवर मदत मिळाल्यास आम्ही पुन्हा नव्याने उभे राहू,” असे प्रतिपादन अनेक शेतकऱ्यांनी यावेळी केले.

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या या तत्पर प्रतिसादाचे कौतुक केले असून, आता प्रशासनाकडून लवकरात लवकर मदतीच्या कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त होत आहे. या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या थेट सरकारदरबारी पोहोचल्या असून, तत्काळ मदतीसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत, हे या दौऱ्याचे प्रमुख यश मानले जात आहे.