BJP-Congress MLAs unite to dismiss NIT : नागपुरातील आमदार आक्रमक, अनोखी एकजूट
Nagpur नागपूर सुधार प्रन्यासमध्ये NIT असलेल्या गैरव्यवहारावरून आज नागपुरातील आमदारांनी प्रश्न धसास लावला. अखेर नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करणे व इतर प्रश्नांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी एक समिती गठीत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही मागणी लावून धरण्यासाठी नागपुरातील भाजप व काँग्रेसच्या आमदारांची एकजूट झाली होती.
नागपूर सुधार प्रन्यासमधील लेआऊटमधील काही भूखंडांना आरएलची (निवासी लेआऊट) परवानगी दिली जात नसल्याबद्दल पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी बोलताना त्यांनी काही अधिकार्यांवर थेट हल्लाबोल केला. काही अधिकारी सामान्य लोकांची अडवणूक करतात व त्यांच्या भूखंडांना आरएलची मान्यता दिली जात नाही. परंतु काही श्रीमंतांना मात्र आरएलची तात्काळ मान्यता दिली जाते.
यात अधिकारी हे मोठे व्यवहार करतात. या व्यवहाराची चौकशी करून अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली. यावरून आमदार डॉ. नितीन राऊत यांनी सुद्धा उत्तर नागपूरमध्ये एनआयटीच्या लेआऊटचा मोठा प्रस्न बिकट झाला आहे. अनेक लेआऊटमध्ये घरे बांधलेल्या घरांना आरएल मिळत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेत एनआयटी बरखास्तीची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनआयटी बरखास्तीचा निर्णय घेतला होता परंतु महाविकास आघाडी सरकारने एनआयटी पुनर्जिवीत केली. एनआयटीमुळे शहराचा विकास होत नाही. आमदार दटके यांच्या मागणीला आमदार कृष्णा खोपडे व आमदार मोहन मते यांनीही पाठिंबा दिला.
अखेर या आक्रमक आमदारांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांच्या सर्व मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. ही समिती एनआयटी बरखास्त करण्याच्या संदर्भात विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.