Sanjay Raut’s warning after Modi Shah Presidential meeting : मोदी-शाह राष्ट्रपती भेटीनंतर संजय राऊतांचा इशारा
New Delhi : देशात एकीकडे संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच, रविवारी दिल्लीत एक नाट्यमय घडामोड घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्यानंतर थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा राष्ट्रपती भवनात दाखल झाले. या भेटींनी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा करत एकप्रकारे राजकीय बॉम्बच फोडला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, सप्टेंबर महिन्यात देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. ही फक्त अफवा नाही. आमच्याकडेही माहिती आहे. सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत भविष्यातील घडामोडींवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे.राष्ट्रपतींना एकाच दिवशी पंतप्रधान आणि गृहमंत्री भेटायला जातात, हेच मोठं सूचक असल्याचं राऊतांनी नमूद केलं.
राष्ट्रपतींनी त्यांना बोलावलेलं नाही, हे महत्त्वाचं आहे. ते स्वतः जाऊन भेटत आहेत. याचा अर्थ या भेटी सामान्य नाहीत. देशातील स्थिती पाहता कधी काय होईल सांगता येत नाही, असं म्हणत त्यांनी संकेतांचे धागेदोरे उलगडले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका वक्तव्यावर संजय राऊतांनी कौतुकाची थाप दिली. गांधी – नेहरूंच्या विचारांचा उल्लेख करणारे ते सध्याचे सरकारमधील सर्वात समजदार मंत्री आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपवर टोला लगावत विचारलं, नेहरूंचं नाव घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाही ना?
Maharashtra politics : मराठीसाठी हिंसक होणारच! गोळ्या घालणार का?
मुंबईतील मेट्रो स्टेशनचे उदाहरण देत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. सायन्स सेंटर स्टेशनचं नाव बदलून तिथून नेहरूंचं नाव हटवलं, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानचं नाव टाळून फक्त ‘राष्ट्रीय उद्यान’ केलं. नेहरू-द्वेष किती खोल आहे हे यातून दिसतं,असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या इतिहासाच्या दृष्टिकोनावर सवाल उपस्थित केला. देशाच्या राजकीय क्षितिजावर सप्टेंबर महिना काहीतरी मोठं घेऊन येणार, याचे संकेत दिल्लीत सुरू असलेल्या हालचाली आणि राऊतांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे उमटत आहेत.