Breaking

Road Safety Campaign : रस्ते चांगले झाले तरीही अपघाती मृत्यू वाढले!

Accidental deaths have increased despite improved roads : वर्धा जिल्ह्यातील वास्तव; एकट्यात जानेवारीत १५ बळी

Wardha पूर्वी रस्ते खराब होते. गाडी चालवणे सोडा, साधे पायी चालणे देखील अवघड होते. अशात वारंवार अपघात व्हायचे. लोकांचे जीव जायचे. मात्र आता रस्ते चांगले आणि मोठे झाले. पण तरीही अपघात आणि अपघाती मृत्यूंची संख्या काही कमी होत नाही. वर्धा जिल्ह्यात उत्तम रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे, तरीही एकट्या जानेवारी महिन्यात १५ लोकांचे अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सातत्याने यासंदर्भात खंत व्यक्त करीत असतात. अगदी दोन दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात २०२३ मध्ये रस्ते अपघातात देशातील १ लाख ८० हजार लोकांचे प्राण गेल्याची माहिती दिली. पूर्वी रस्ते सुरक्षा सप्ताह राबवला जायचा. नंतर सप्ताहाचा पंधरवडा झाला.

Artificial Intellengence in health sector : AI मशीनने काढले ६८ हजार ६२६ ECG!

आता महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबविले गेले. मात्र, जानेवारी महिन्यात शहर-जिल्ह्यात एक दोन नव्हे, तर तब्बल १५ जणांचा अपघाती बळी गेला आहे. जानेवारी २०२४ मध्ये एकूण २९ अपघात झाले होते. त्यात १० जणांचा बळी गेला होता. जानेवारी २०२५ मध्ये ४० अपघात झाले आणि १५ जणांचा बळी गेला आहे. यात गतवर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी अपघात अन् बळींची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात पूर्वी वारंवार अपघात होणारे जवळपास ३० ते ४० ‘ब्लॅक स्पॉट’ होते. या ठिकाणी वर्षानुवर्षे अपघाताचा धोका दर्शविणारे फलक होते. मात्र, अपघातस्थळे नष्ट करण्यात आली नव्हती. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वत्र अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जिल्ह्यातील अपघातस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामुळे सध्या केवळ बोटावर मोजण्याइतपत अपघातस्थळे कायम आहेत. एकीकडे अपघातस्थळे नष्ट केली जात आहेत. रस्तेही मोठे झाले आहेत. पूर्वी नादुरुस्त रस्ते, खडे, गतिरोधक आदी कारणांमुळे अपघात होत होते. परंतु, आता मानवी चुकांमुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Shivbhojan : आघाडी सरकारची ही योजना आजही ठरतेय कष्टकऱ्यांसाठी वरदान!

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे. अतिवेगाने वाहन चालवणे. मद्यप्राशन करून वाहन चालवणे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे. हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न लावणे, आदी कारणांमुळे अपघात होऊ लागले आहेत. नुकतेच जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. आरटीओ RTO, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. परंतु, याच महिन्यात तब्बल १५ जणांचा अपघातात बळी गेला. तर १० जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे वर्षभर अभियान राबविण्याची वेळ आली आहे.