A loan of 73 lakhs was taken by mortgaging fake jewellery : सुवर्णकाराला अटक; शिक्षक सहकारी बँकेतील प्रकार
Nagpur पैसा कमावण्यासाठी नवनवीन शक्कल लढविणाऱ्यांची या जगात कमतरता नाही. नागपुरात तर एकाने शिक्षक सहकारी बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेतच ७३ लाखांचा डल्ला मारला. पण हे पैसे त्याने कुणीही कल्पना करू शकणार नाही, अशा पद्धतीने चोरले. त्यासाठी त्याने दागिण्यांवर मिळणाऱ्या कर्जाचा मार्ग अवलंबला. दागिणे तपासण्यासाठी ठेवलेल्या सुवर्णकारानेच बँकेचा गेम केला.
बँकेत गहाण ठेवण्यात आलेले सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने थेट ग्राहकांशी हातमिळवणी केली. बनावट दागिणे बँकेत ठेवले. त्या बनावट दागिण्यांवर कर्ज मिळवले आणि ७३ लाख ९० हजार रुपयांनी बँकेची फसवणूक केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनिल उरकुडे (५९) रा. लालगंज असे आरोपीचे नाव आहे.
पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत कमाल चौक येथे शिक्षक सहकारी बँकेची शाखा आहे. लक्ष्मण सगम (५७) या शाखेचे व्यवस्थापक आहेत. अनिल उरकुडे हा सुवर्णकार आहे. त्याला दागिणे तपासणीसाठी नियुक्त करण्यात आले होते. बँकेत सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांचे दागिणे खरे आहेत की नाही, याची शहानिशा करण्याची जबाबदारी अनिलची होती. त्याच्या प्रमाणपत्रावरूनच सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांना कर्ज मंजूर करण्यात येत होते. हीच संधी साधून अनिलने शक्कल लढविली.
२४ मार्च २०१७ ते ३१ जुलै २०१८ या १६ महिन्यांच्या कालावधीत त्याने १६ ग्राहकांशी हातमिळवणी केली. विशेष म्हणजे सगळे १६ ग्राहक त्यानेच तयार केले. बनावट दागिने घेऊन आलेल्या ग्राहकांना कर्ज मिळण्यासाठी त्याने मार्ग मोकळा करून दिला. म्हणजे बनावट दागिणे असल्यानंतरही त्याने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेला दिले. त्यामुळे बँकेने त्या सर्व ग्राहकांना कर्ज दिले.
सुरूवातीचे काही महिने ग्राहकांनी पैसे भरले. मात्र, नंतर बँकेचे हप्ते थकले. बरेच दिवस होऊनही ग्राहक हप्ते भरत नसल्याने बँक व्यवस्थापनाने चौकशी केली. ग्राहकांशी संपर्क साधला. त्यांची समजूत घातली. यानंतरही ग्राहकांनी पैशाची परतफेड केली नाही. बँकेचे कर्मचारी वारंवार तगादा लावत असल्यामुळे एका कर्जदात्याने सारा प्रकार बँक व्यवस्थापनाला सांगितला. त्यानंतरच बनावट दागिण्यांच्या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत incoming मोठी रांग!
बँक व्यवस्थापनाने वर्षभरापूर्वीच अनिलला नोटीस बजावली. कार्यालयाने त्याची चौकशी सुरू केली. अहवाल आल्यानंतर बँक व्यवस्थापक सगम यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर अनिल विरूध्द गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी आहेत का, याचाही तपास करण्यात येणार आहे. या प्रकारामुळे बँकेतील अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचवेळी इतरही बँकांमध्ये झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.