Breaking

Delhi Sahitya Sammelan : साहित्य परिषदेची घटना साकारणारे अकोल्याचे साहित्य संमेलन !

The foundation of the constitution of Sahitya Parishad was formed at Akola : दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठवणींना उजाळा

महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीला दिशा देणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अधिकृत स्थापनेचा पाया अकोला येथे 1912 मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात घातला गेला.

1909 चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे पार पडले होते. मात्र, त्यानंतर 1910 व 1911 या वर्षी संमेलन होऊ शकले नाही. असा खंड पडू नये, यासाठी अकोला येथील सामाजिक चळवळीचे नेते, साहित्यिक आणि प्रबोधनकार वि. मो. महाजनी यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि अखेर सातवे साहित्य संमेलन अकोल्यात आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे, वि. मो. महाजनी हेच पुणे येथे 1907 मध्ये पार पडलेल्या पाचव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

Water shortage : मोठं संकट! ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाई?

1912 मध्ये वऱ्हाड प्रांताची विद्या परिषद अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने अकोल्यातच महाराष्ट्राची साहित्य परिषद भरवावी, असा प्रस्ताव प्रबोधनकार महाजनी यांनी मांडला. त्याकाळी प्लेगसारख्या साथीच्या रोगांचा धोका कायम असायचा. त्यामुळे संमेलनावर संकट येऊ शकतं, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सुदैवाने संमेलन निर्विघ्न पार पडले.

अकोला येथे 29, 30 आणि 31 ऑक्टोबर 1912 रोजी सातवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून वि. मो. महाजनी यांची निवड झाली. महाराष्ट्रातील विविध शहरांसह इंदूर, देवास, धार, ग्वाल्हेर, काशी, प्रयाग, बडोदा, अहमदाबाद, कोलकाता, रंगून आदी ठिकाणच्या साहित्यप्रेमींना जवळपास 800 निमंत्रणपत्रे पाठविण्यात आली होती.

संमेलनात मराठी भाषा आणि साहित्यविषयक सात सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष नामवंत कादंबरीकार हरी नारायण आपटे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेतील इंग्रजी शब्दांचा वाढता प्रभाव यावर चिंता व्यक्त केली आणि काही उपाय सुचवले. आपटे म्हणाले, “विद्यापीठांमध्ये महत्त्वाचे विषय मराठीतून शिकवले जावेत. मॅट्रिकपर्यंतचे सर्व शिक्षण मराठीतूनच असले पाहिजे. मराठी साहित्य सभेसारख्या संस्थांनी मराठी शब्दकोशाची अद्ययावत आवृत्ती नियमित प्रकाशित करावी. तसेच, देशातील सर्व भाषांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन विविध शास्त्रांतील पारिभाषिक शब्दांचा कोष तयार केला पाहिजे.”

Chhaava Movie : ‘छावा’ने अपमान केला नाही, मान वाढवला!

ते पुढे म्हणाले, “आपली मातृभाषा मराठीचा अभिमान बाळगणे आवश्यक आहे. अभिमान असलेल्या व्यक्तींमुळेच मराठी भाषेला अर्थसमर्थता मिळाली आहे. ही भाषा इतकी समृद्ध आहे की, कोणत्याही शास्त्राचे शिक्षण त्यात देता येते आणि कुठलाही विचार प्रभावीपणे मांडता येतो.”

1909 मध्ये बडोदा येथे डॉ. कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात साहित्य संमेलनाची अधिकृत नियमबद्ध घटना असावी हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला 1912 मधील अकोला संमेलनात मूर्त स्वरूप मिळाले आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची अधिकृत स्थापना झाली.

त्या काळात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुख्यालय मुंबई येथे होते. अकोल्याचे प्रबोधनकार वि. मो. महाजनी हे साहित्य परिषदेचे पहिले अधिकृत अध्यक्ष ठरले. पुढे 1915, 1917 आणि 1922 मध्येही ते अध्यक्षपदी निवडून आले. महाराष्ट्राचे साहित्य आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे-मुंबईच्या बाहेर, वऱ्हाडातील अकोला येथून साहित्य संमेलनाचे नेतृत्व महाजनी यांनी दीर्घकाळ सांभाळले. ही बाब त्यांची साहित्यसेवा आणि अकोला शहराचा गौरव दर्शवते.

Rajiv Pratap Rudy : सुधीरजींसारखं काम करणारा नेता देशात दुर्मिळच

महाजनी यांच्या कार्यकाळात “महाराष्ट्र साहित्य पत्रिका” या नियतकालिकाचा प्रारंभ झाला. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी त्यांनी मोठे संघटनात्मक कार्य केले. त्यांच्या साहित्यिक योगदानावर आधारित लेखिका डॉ. पुष्पा लिमये यांनी “एकोणविसाव्या शतकातील प्रबोधनकार : विष्णू मोरेश्वर महाजनी (व्यक्ती आणि वाङ्मय)” हा सखोल अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. त्या काळात अकोल्याहून “वऱ्हाड समाचार” हे वर्तमानपत्र प्रसिद्ध होत असे. या वृत्तपत्रात साहित्य संमेलनासह अकोल्यातील सामाजिक चळवळींवरील वृत्तांत नियमितपणे प्रकाशित होत असे, हे विशेष.

संमेलन अधिक संघटित झाले..
अकोला संमेलनात अत्यंत महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले. साहित्य संमेलन दरवर्षी नियमितपणे व्हावे, वेगवेगळ्या प्रांतांत संमेलन आयोजित करावे, संमेलनाच्या आर्थिक गरजांसाठी एक कायमस्वरूपी निधी उभारावा, या ठरावांचा यात समावेश होता. अकोला संमेलनामुळे साहित्य चळवळीला पुढील दिशा मिळाली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अधिक संघटित झाले.

हर्षवर्धन पवार
जिल्हा माहिती अधिकारी, अकोला