Blackened the board of the school where Bhoomi Pujan was performed by BJP MLA : तोंडगाव जिल्हा परिषद शाळेतील घटनेनंतर राजकीय वाद
Amravati अचलपूर विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी बॅनर फाडण्याच्या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले होते. त्यातच आता आणखी एक वादग्रस्त घटना घडली आहे. चांदूरबाजार तालुक्यातील तोंडगाव जिल्हा परिषद शाळेच्या पायाभरणी समारंभानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या फलकावर अज्ञात व्यक्तीने काळे फासल्याचे उघडकीस आले.
तोंडगाव येथील समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद अमरावतीच्या माध्यमातून केंद्र शासनाने शाळेच्या इमारतीसाठी १ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, भूमिपूजन झाल्यानंतरही अनेक महिन्यांपासून काम सुरू न झाल्याने गावकऱ्यांनी व भाजप पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्याकडे कामाला गती देण्याची मागणी केली. याला प्रतिसाद देत आमदार तायडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. अचलपूर मतदारसंघातील ९ शाळांच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, २९ जानेवारी रोजी तोंडगाव जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजनानंतर शासकीय नियमानुसार कामाचे नाव, अंदाजित खर्च आणि उद्घाटन करणाऱ्या आमदारांचे नाव असलेल्या फलकावर ३१ जानेवारीच्या रात्री अज्ञात व्यक्तीने काळा ऑइलपेंट टाकल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून, अशा कृत्यांमुळे गावाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रकरणी गावकऱ्यांनी आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी समंजस भूमिका घेत गावात कोणताही वाद निर्माण होऊ नये, याची काळजी घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच, गावात शांतता राखण्याचे आवाहनही करण्यात आले.
स्थानिक भाजपा पदाधिकारी राजू डवरे यांनी, “गावातील विकासकामे सुरू असताना अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत, यासाठी गावकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पोलिसांनी याप्रकरणी कायदेशीर कारवाई करून गावात शांतता प्रस्थापित करावी,” अशी मागणी केली.
यापूर्वी भूमिपूजन झालेले काम
तोंडगाव येथे शाळेच्या नव्या इमारतीसाठी आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकाळात निधी मंजूर होऊन त्यांनी भूमिपूजन केले होते. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने नवनियुक्त आमदार प्रवीण तायडे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी कामाला गती दिली. त्यांनी पायाभरणी सोहळा पार पाडत बोरवेलची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून दिली.
CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याला मिळणार का १२०० कोटी?
ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत, “शैक्षणिक आणि सामाजिक कामांमध्ये राजकारण आणणे योग्य नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे,” असे मत मांडले.