Give funds, otherwise allow self-immolation : प्रहार जनशक्ती पार्टीचा सरकारला इशारा
Gondia Tiroda काम केले, पण पैसे मिळाले नाहीत. जिल्हा परिषदेच्या दिरंगाईमुळे शेकडो ठेकेदार आणि पुरवठादार आर्थिक संकटात सापडले आहेत. २०१९-२० मध्ये ग्रामपंचायतींना विशेष अनुदानातून मंजूर झालेल्या ७६ विकासकामांचा ३३ टक्के निधी अद्याप थकीत आहे. प्रशासन वारंवार आश्वासने देत असले तरी प्रत्यक्षात निधी मिळत नसल्याने ‘प्रहार जनशक्ती पक्ष’ने आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘थकीत पैसे मिळाले नाहीत तर ७ एप्रिलला जिल्हा परिषद दालनात आत्मदहन करू,’ असा थेट इशारा जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर यांनी दिला आहे. भांडारकर यांनी राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संताप व्यक्त केला आहे.
“काम झाले, निधी मंजूर आहे, तरी अधिकाऱ्यांची चालढकल सुरू आहे. पुरवठादारांसाठी हे मोठे आर्थिक संकट आहे. जर ७ एप्रिलपर्यंत थकीत निधी दिला नाही, तर आत्मदहनाशिवाय पर्याय नाही. याला प्रशासन जबाबदार राहील!” असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील विकासकामांसाठी मंजूर निधी वेळेवर वितरित होत नाही. अनेक ठेकेदार आणि पुरवठादारांना मोठ्या कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागत आहे. “शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक जण उद्ध्वस्त झाले आहेत. काहींना आपले व्यवहार बंद करावे लागले, तर काहींवर कर्जाचा डोंगर वाढत आहे.” असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
“सरकारने आणि प्रशासनाने वेळेत निधी दिला नाही, तर आम्ही यापेक्षा मोठे आंदोलन करू. आत्मदहन हा आमचा शेवटचा उपाय आहे. पण आम्हाला न्याय मिळाला नाही, तर प्रशासनाला जबाबदार धरले जाईल,” असेही त्यांनी म्हटले आहे. ७ एप्रिलपर्यंत प्रशासन जागे होईल का? की संतप्त पुरवठादारांची धग अधिक तीव्र होईल? प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.