Revenue Minister in ‘action mode’ against sand mafia : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन-वाहतुकीवर एमपीडीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
Buldhana जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर एमपीडीए (महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा) MPDA अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना महसूल विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
शनिवारी झालेल्या या बैठकीला कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपवनसंरक्षक सरोज गवस, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
Prahar Janshakti Party : प्रहारच्या महिलांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना बांधल्या काळ्या राख्या!
महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे तसेच यात सामील महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कडक निगराणी ठेवावी. मंत्री-खासदार-आमदारांच्या सूचनांनुसार वाळू माफियांना सोडू नये. जिल्ह्यात अशा प्रकारच्या कारवायांची जबाबदारी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवर निश्चित केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
याशिवाय, जिल्ह्यातील सर्व वाळू साठे व घाटांचे पुन्हा सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देत त्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना एमआरसॅक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सांगितले. नवीन वाळू धोरणानुसार कृत्रिम वाळूचा दर्जा उच्च ठेवावा, गरीब व सर्वसामान्यांना घरकुलांसाठी वाळू सहज उपलब्ध करून द्यावी, तसेच अवैध वाहतुकीवरील दंड वसूल करावा, असेही ते म्हणाले.
गायरान जमिनीवरील घरांच्या प्रकरणांचे निपटारे, शासकीय जमिनीवरील बेकायदेशीर कब्जे हटविणे, पाणंद व शिवररस्ते मोकळे करणे, गावनिहाय नकाशे दर्शनी भागात लावणे, लोक अदालतीचे आयोजन, विशेष सहाय योजना व ॲग्रीस्टॅक अंतर्गत गावपातळीवरील नोंदणी मोहिम, तसेच पोटखराब-कजाप-सातबारा दुरुस्ती ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही महसूल मंत्र्यांनी दिले. तसेच, शासन धोरणानुसार डिसेंबरपर्यंत भोगवटादार वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रुपांतर करावे, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
Vanchit Bahujan Aghadi : माेताळा तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कागदाेपत्रीच मुख्यालयी
जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘ई-चावडी’ आणि ‘जिवंत सातबारा’ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांनी कौतुक केले व या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विषयक कामकाजाची माहिती दिली.