Ram Mandir lit up with lamps : पुनर्निर्माण वर्षपूर्तीनिमित्त उत्सव
Akola अयोध्येत ५०० वर्षांनंतर राममंदिराचे पुर्ननिर्माण ११ जानेवारी रोजी २०२४ मध्ये झाले होते. या वर्षपूर्तीनिमित्त बिर्ला राम मंदिरात शनिवार, ११ जानेवारी रोजी सकाळपासून शेकडो महिलांनी विजय ग्रंथाचे पारायण केले. संत गजानन महाराजांचा जयघोष, अखंड रामनामाचा जाप आणि सायंकाळी लाखो दिव्यांच्या आरासने लख्ख प्रकाशाने न्हाऊन निघाले.
ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प आणि नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने जठारपेठेतील बिर्ला राम मंदिर येथे १५०० महिलांनी सहभाग घेतला. श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले. २४ तास अखंड रामनामाचा जाप करण्यात आला. समर्थ गजानन महाराजांचे पारायण झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता राम मंदिर व परिसरात महिला व पुरूष भाविकांनी हजारो दीप प्रज्वलित केले. त्यामुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला होता.
त्यानंतर संकल्प ग्रुपच्यावतीने ढोलाच्या निनाद करण्यात आला. यावेळी परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. सायंकाळी ७ वाजता उपस्थित शेकडो भाविकांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या नामाचा गजर केला.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पुर्ननिर्माणाला ११ जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने बिर्ला राम मंदिराच्या कळसावर गुलाब पुष्पाचा वर्षाव करण्यात आला.
बिर्ला राम मंदिर परिसरात आयोजित श्री.गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण झाल्यानंतर संध्याकाळी ६ वाजता ५०१ जोडप्यांच्या हस्ते संतश्रेष्ठ गजानन महाराज आणि प्रभू श्रीरामचंद्रांची वेदोपमंत्रोपच्चारात महाआरती करण्यात आली. यावेळी रामचंद्राचा जयघोष व संत गजानन महाराजांचा नामस्मरणाने, परिसरातील वातावरण प्रसन्न झाले होते.
कार्यक्रमाला माजी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, रा.स्व. संघाचे महानगरसंघचालक गोपाल खंडेलवाल, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश नेते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. विनायक देशमुख, माजी आमदार वसंतराव खोटरे, अँड गिरीश गोखले, कुशन सेनाड, डॉ. पनपालिया, उदय महा, राजेश शर्मा, दीपक शुक्ला उपस्थित होते.