Vanchit Bahujan Aghadi leader questions Congress : प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल, ‘ईव्हीएम’चा वाद पुन्हा उफाळला
Akola लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनच्या वापरावरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केल्यानंतर विरोधकांमध्ये चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ईव्हीएमविरोधात लढा द्यावा, असे स्पष्ट आवाहन केले होते. मुंबईत झालेल्या सभेतही त्यांनी काँग्रेसकडून या मोहिमेत पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी याबाबत मौन बाळगले होते. आंबेडकर यांच्या मते, “त्या वेळी काँग्रेसने ठोस भूमिका घेतली असती, तर आज परिस्थिती वेगळी असती.”
Vidarbha Farmers : अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल, सरकारकडे लागल्या नजरा!
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांमुळे आता विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आंबेडकर यांनी याच मुद्द्यावर काँग्रेसला जाब विचारला. “निवडणुकीतील अन्याय खरंच दूर करायचा आहे का? की हे सर्व केवळ दिखावा आहे?” असा थेट सवाल त्यांनी काँग्रेसकडे केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.
आंबेडकर पुढे म्हणाले, “निवडणूक आयोगावर आरोप करण्यापेक्षा विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत ठोस कृती आराखडा तयार करायला हवा. जनतेसमोर स्पष्ट योजना मांडणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. फक्त आरोप करून चालणार नाही.”
Chandrashekhar Bawankule : शिक्षकांचा दोष नाही, संस्थाचालकांची संपत्ती जप्त करा !
यापूर्वी प्रकाश आंबेडकरांनी ईव्हीएम हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचाही पर्याय सूचित केला होता. मात्र, काँग्रेसने त्यात सहभाग घेतला नाही. आंबेडकर यांच्या मते, “काँग्रेसकडे ताकद आहे, संसाधने आहेत, मग त्यांनी पुढाकार का घेतला नाही?”
राहुल गांधी यांनी विधानसभेच्या पराभवानंतर निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपामुळे वाद पेटला असला तरी विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा अधिकच गडद झाला आहे.
राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे की, काँग्रेस खरोखर ईव्हीएमविरोधी मोहिमेला गांभीर्याने हाताळणार का? की हा मुद्दा केवळ निवडणूक प्रचारापुरता मर्यादित राहणार? आगामी काळात विरोधकांचा खरा चेहरा समोर येईल, असे निरीक्षक सांगत आहेत.