Fadnavis, Shinde and Pawar’s letter to Amit Shah : फडणवीस, शिंदे आणि पवार यांचे अमित शाहांना पत्र
Mumbai: महाराष्ट्रात सलग चार दिवस पडत असलेल्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह जनजीवनाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो नागरिक उघड्यावर आले असून, शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे मदतीसाठी पत्र पाठवले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्या सहीचे निवेदन अमित शाह यांना देण्यात आले. या पत्रातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी व नागरिकांसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी मधून भरीव मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Reservation control : हे गरिबी हटाव नाही… आरक्षणावरून राष्ट्रवादीत वाद !
फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे की, राज्यातील ३१ हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस व पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगाम अखेरपर्यंत सप्टेंबर २०२५ तब्बल ५ दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त सुमारे ५० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. राज्य सरकारने २,२१५ कोटी रुपयांचे वाटप केले असले, तरी आपत्तीचे प्रमाण खूप मोठे असल्याने राज्याची संसाधने अपुरी पडत आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे की, एनडीआरएफ मधून मिळणाऱ्या निधीच्या मदतीने पीक नुकसान भरपाई, जनजीवनाला आधार, पशुधनाच्या नुकसानीची भरपाई तसेच पूरग्रस्त भागातील मालमत्तेची पुनर्बांधणी करता येईल. शिवाय, पूरग्रस्त शेती जमिनीबाबतचा सविस्तर प्रस्ताव केंद्राला लवकरच सादर केला जाईल, असेही त्यांनी कळवले आहे.
आता केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अतिरिक्त मदत मंजूर होते का, याकडे राज्यातील शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांचे लक्ष लागले आहे.