Local elections may be in two phases : दिवाळीपूर्वीच आटोपण्याचे नियोजन; महायुती आणि आघाडी लागले कामाला
Buldhana राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा अखेर जवळ आली असून, दिवाळीपूर्वी नगर पालिका आणि महापालिका तर दिवाळीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पाच महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक यंत्रणा कामाला लागली असून, आता सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.
‘एक राज्य, एक निवडणूक’ संकल्पनेला फाटा
राज्य आणि केंद्र सरकारकडून ‘एक देश, एक निवडणूक’ या संकल्पनेचा गाजावाजा होत असतानाच प्रत्यक्षात मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत घेण्याच्या हालचालींमुळे या संकल्पनेला तात्पुरता फाटा मिळाल्याचे बोलले जात आहे. पावसाळा संपताच, म्हणजेच सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात नगर पालिका व महापालिकांच्या निवडणुका होणार असून, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दिवाळीनंतर घेतल्या जातील.
Chandrashekhar Bawankule : पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध
प्रशासक हटतील, जनतेचे सरकार येणार
राज्यात सध्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक कार्यरत आहेत. न्यायालयाच्या आदेशामुळे आता निवडणुका अनिवार्य असल्याने प्रशासकीय काळ संपुष्टात येणार आहे. ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी नुकताच निवडणूक तयारीचा आढावा घेतला असून, सर्कल रचना, आरक्षण, मतदार यादी अद्यावत करणे आणि मतदान केंद्रांचे निर्धारण यावर भर देण्यात आला आहे.
राजकीय घडामोडींना वेग: सानंदा यांचं ‘पवार’ प्रेम?
खामगाव विधानसभा मतदारसंघात सध्या एक महत्त्वाची राजकीय चर्चा रंगली आहे – माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार का? जर त्यांनी प्रवेश केला, तर महायुतीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. सानंदा हे भाजपसोबत आघाडी करून निवडणूक लढवतील का, की स्वबळावर उतरतील, यावरही स्थानिक राजकारणाचे गणित अवलंबून असेल. म्हणून सानंदा यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यांचा निर्णय केवळ खामगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक राजकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. विशेषतः नगरपालिकांमध्ये कोणत्या गटाला बहुमत मिळेल, याचे संकेत त्यांच्या भूमिकेवरून मिळू शकतात.
Chandrashekhar Bawankule : नेत्यांच्या मागे फिरून तिकीट मिळणार नाही
निवडणुकांची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात
निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरू असून, मतदार यादींचे अद्ययावतीकरण, आरक्षण प्रक्रिया, मतदान केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. स्थानिक राजकारणात चढाओढ सुरू असून, अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवारांकडून जनसंपर्क सुरू झाला आहे. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमधील राजकीय रणधुमाळी आता हळूहळू उफाळून येत आहे.