Breaking

CM Devendra Fadnavis : महिना झाला वीज नाही, शेतकऱ्यांना हवे स्वेच्छा मरण!

No electricity supply to farmers since a month : देवधाबा येथील शेतकऱ्यांचे हाल; ऊर्जामंत्र्यांचे दुर्लक्ष

Buldhana  बुलढाणा जिल्ह्यातील देवधाबा येथील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. गेल्या एका महिन्यापासून वीजपुरवठा खंडित असल्यामुळे शेतपिकांना पाणी देता न आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मौजे देवधाबा येथील शेतकरी अविनाश कुलकर्णी यांच्या शेतातील रोहित्राचे वीज कनेक्शन खंडित आहे. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही वारंवार महावितरणकडे संपर्क साधून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र, महावितरणने सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Akola Shiv Sena : चिखलगाव सर्कलमधील शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश

सदर काळात पेरण्या झालेल्या असून कापसाला पाणी न मिळाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी टोकाचा मार्ग स्वीकारला.

या प्रकरणात आमदार चैनसुख संचेती यांनीही महावितरणला लेखी सूचना देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. मात्र, महावितरणने आमदारांच्या सूचनांनाही महत्त्व न देता बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

Amravati Congress : ‘प्रभाग हाच किल्ला आहे’, काँग्रेसचा कार्यकर्त्यांना मंत्र

तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी थेट असा सवाल केला आहे की, “शेतकरी मेल्यावरच सरकारला जाग येणार का?” शेतकऱ्यांना वेळेवर वीजपुरवठा ही मूलभूत गरज आहे. याबाबतीत प्रशासनाचे दुर्लक्ष अक्षम्य आहे. पिकांवर संकट आल्यावर शेतकरी स्वेच्छा मरणाची मागणी करतो, ही बाब लोकशाही व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.