Manoj Jarange Patil’s direct warning to the government : मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
Mumbai : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारवर थेट हल्ला चढवला. “आम्ही मराठ्याची औलाद आहोत. सरकार कितीही दबाव टाको, कितीही भीती दाखवो, तरी मी आझाद मैदानावरून उठणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला.
सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करताना जरांगे यांनी शनिवारी आणि रविवारी राज्यातील मराठे मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतील, असा इशारा दिला. “वेशीवर मराठे अडवले तरी ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचणारच. सोमवारी मराठ्यांचा असा महापूर ओसंडून वाहेल की सरकारलाच ओळखता येणार नाही कोण मुंबईकर आणि कोण मराठा,” असे ते म्हणाले.
“आझाद मैदानावर मेलो तरी चालेल पण उठणार नाही. देवेंद्र फडणवीस न्यायालयाला खोटी माहिती देतात. सरकार चर्चेला तयार असेल तर आम्हीही तयार आहोत. पण ३०-३५ मंत्री आणू नका, दोन मंत्री या आणि सन्मानाने या. हैदराबाद आणि सातारा संस्थानच्या गॅझेटला तुम्ही का घाबरता? पूर्वजांनी शिकवले आहे, घास घास खाऊन समाजाला पिढ्यानपिढ्या पुरेल अशी ताकद निर्माण करायची,” असे ते म्हणाले.
Maratha Agitation : जरांगे पलटले, म्हणे.. आता ज्यांची गॅझेटमध्ये नोंद आहे, त्यांना आरक्षण द्या !
सरकारने योग्य वेळी निर्णय घेतला नाही तर राज्यातील असंख्य मराठे शनिवारी-रविवारी मुंबईत दाखल होतील आणि मग परिस्थिती हाताबाहेर जाईल, अशी चेतावणी त्यांनी दिली. “कबड्डी खेळायच्या आधी खो द्यायचा नसतो, तसंच आता सरकारने खेळकरपणा सोडून गंभीर निर्णय घ्यायला हवा. नाहीतर मुंबईची तुंबई होईल,” असे जरांगे पाटील म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे येत्या दोन दिवसांत राज्यातील राजकीय वातावरणात प्रचंड वादळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते आहे.