Congress will try luck for the post : सभापतीपदासाठी काँगेस-राष्ट्रवादी प्रबळ दावेदार
Arjuni Morgaon पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस सहभागी होणार आहे. सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे महिला सदस्य काँग्रेसकडे नाहीत. परंतु उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आतापासूनच व्यूहरचना आखत आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी भाजप-राष्ट्रवादी दावेदार आहेत. मात्र, उपसभापतीपदासाठी काँग्रेसमुळे चुरस निर्माण झाली आहे.
पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. त्यात अर्जुनी मोरगाव पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलासाठी राखीव निघाले. पं.स.मध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून गोठणगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आम्रपाली कांतीलाल डोंगरवार या एकमेव महिला सदस्य आहेत. दुसरे स्पर्धक सदस्य नसल्याने आम्रपाली डोंगरवार यांची वर्णी निश्चित मानली जात आहे.
अर्जुनी मोरगाव पंचायत समितीमध्ये यापूर्वी भाजपाचे एकहाती वर्चस्व होते. ६ मे २०२२ मध्ये पंचायत समिती सभापतींची निवड करण्यात आली होती. त्यावेळी अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी सभापतीपद आरक्षित करण्यात आले होते. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता भाजप, अपक्ष यांच्या युतीने वंचित बहुजन आघाडीच्या एकमेव विजयी झालेल्या सविता काेडापे यांची सभापतीपदी वर्णी लागली होती. तर अपक्ष निवडून आलेले होमराज पुस्तोडे यांची उपसभापतीपदी वर्णी लागली होती.
पंचायत समितीमध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिक सदस्य असल्याने सभापती व उपसभापती पदावर वर्चस्व राहणार यात कसलेही दुमत नाही. सभापतीपदी महिला विराजमान होणार आहे. उपसभापती पदावर पुरुष सदस्यांना संधी मिळणार, हे निश्चित आहे. उपसभापतिपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज आहेत.
पुढील अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात येथील सभापतिपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित निघाले. गोठणगाव पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या आम्रपाली डोंगरवार या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव पं.स. सदस्य आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही सदस्य नसल्याने त्यांची निवड निश्चित आहे