Mahamorcha in Mumbai, the time after Dussehra come : मुंबईत महामोर्चा, दसऱ्यानंतरचा मुहूर्त ठरला!
Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक होणार असून, यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेवर शिक्कामोर्तब होणार आहे. मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ देखील या बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अलीकडेच मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले होते. राज्यभरातून मराठा समाज मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाला होता. त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत शासन निर्णय, जीआर जारी केला. त्यानंतर जरांगे यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले. मात्र, सरकारच्या या निर्णयाला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे. विशेषतः छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
Shashikant Shinde : मित्रपक्षांना बाजूला करण्याची भाजपची रणनीती
मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे दसऱ्यानंतर मुंबईत महामोर्चा काढण्याचे ठरवले आहे.
दरम्यान, हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. दोन जनहित याचिका दाखल करण्यात आल्या असून अधिसूचना बेकायदा असल्याने ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, प्रलंबित सुनावणीदरम्यान या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची व कुणालाही कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
NCP Sharad Pawar : रस्त्यावर उतरा, लोकांपर्यंत जा, त्यांना न्याय मिळवून द्या
या याचिकांवर लवकरच सुनावणी होणार असून, एक याचिका शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने तर दुसरी वकील विनीत धोत्रे यांनी दाखल केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण प्रश्नानंतर आता ओबीसी समाजाच्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात नवी घडामोडी वेगाने घडत आहेत.