MNS counterattack Who asked for permission : मनसेचा पलटवार परवानगी मागितलेय कुणी?
Mumbai: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये मनसेला सामील करून घेण्याची शक्यता पुन्हा चर्चेत आली असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. “काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही,” असं ठाम वक्तव्य करत सपकाळ यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याच्या शक्यतेवर स्पष्ट नकार दर्शवला. वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
सपकाळ म्हणाले, “इंडिया आघाडीसोबत आमच्या वाटाघाटी या स्थानिक पातळीवर होणार आहेत. जिल्हा, ब्लॉक आणि नगरपालिका पातळीवर आमचं स्थानिक नेतृत्व निर्णय घेईल. त्यामुळे नव्या भिडूची गरज काँग्रेस आणि महाविकास आघाडीला नाही.” त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत नव्या चर्चेला उधाण आलं आहे.
Arvind Sawant : थापाड्या सरकारला शेतकऱ्यांचा कंटाळा, अरविंद सावंतांची टीका
या वक्तव्यानंतर मनसेनेही तातडीने प्रत्युत्तर दिलं. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले, “मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत कुणी काँग्रेसकडे परवानगी मागितली होती का? आमच्याकडून कुणीही त्यांच्याकडे गेलेलं नाही. हर्षवर्धन सपकाळ नेमके कशावरून बोलत आहेत, हे समजत नाही. आमच्या पक्षाचा अंतिम निर्णय फक्त राज ठाकरेच घेतील.”
अभ्यंकर पुढे म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटी या कौटुंबिक स्वरूपाच्या आहेत, राजकीय नाहीत. किमान आम्हाला तरी तशी माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी मनसे-शिवसेना युतीबाबत केलेल्या वक्तव्यांचा आम्हाला आदर आहे, पण आमच्यासाठी राज ठाकरे यांचा आदेशच अंतिम आहे.”
March by the United Tribal Community : आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासींचा एल्गार!
दरम्यान, काँग्रेसच्या भूमिकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेस हा स्वतंत्र विचारधारेचा पक्ष असून, तो महाविकास आघाडीचा भाग असला तरी आपलं मत स्पष्टपणे मांडण्याचा त्याला अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमधूनच येत आहे. सपकाळ यांनी स्थानिक स्तरावर युतीबाबत चर्चा होईल, असंही स्पष्ट केल्याने ठाणे आणि पुण्यातील काँग्रेसची भूमिका वेगळी असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Local Body Election : ११ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला!
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड आणि नाशिकमध्ये मराठी मतांचं विभाजन होऊ नये, ही आमची भूमिका आहे. मात्र काँग्रेस स्वबळावर लढणार की नाही, याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.”
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर मविआ आणि मनसे यांच्यातील संभाव्य समीकरणांवर चर्चेचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे काँग्रेसने नव्या भिडूला नकार दिला असतानाच, दुसरीकडे मनसेनेही स्पष्ट सांगितलं आहे “आम्ही कुणाकडे गेलोच नाही.” त्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणाला आता कोणता वळण मिळतं, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
_____