PF Withdrawal : आता पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढता येणार !

Big decision by the government before Diwali! : दिवाळीपूर्वी सरकारचा मोठा निर्णय!

New Delhi : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी केंद्र सरकारकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीपूर्वीच सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून 100 टक्के रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. याआधी पीएफ काढण्यासाठी 13 वेगवेगळे नियम होते, मात्र आता ते नियम सोपे करून फक्त तीन प्रकारात विभागले गेले आहेत. त्यामुळे पीएफ धारकांना त्यांच्या निधीवर अधिक लवचिकपणे नियंत्रण मिळणार आहे.

नव्या नियमांनुसार, सदस्यांना तीन प्रमुख कारणांसाठी पूर्ण पीएफ रक्कम काढता येणार आहे. शिक्षण, विवाह आणि वैद्यकीय गरजा अशा आवश्यक कारणांसाठी, गृहसंबंधी गरजा आणि विशेष परिस्थिती अशा तीन श्रेणींमध्ये पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षणासाठी दहा वेळा आणि लग्नासाठी पाच वेळा रक्कम काढण्याची परवानगी असेल. सरकारने या दाव्यांची मंजुरी प्रक्रिया देखील सुलभ केली असून अर्ज तात्काळ मंजूर केले जातील.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं चतुर्थ श्रेणी देण्याची मागणी पूर्ण होऊ शकत नाही

ईपीएफओने आगाऊ रक्कम काढण्याच्या मुदतीतही मोठा बदल केला आहे. यापूर्वी भविष्य निधीच्या परिपक्वतेपूर्वी रक्कम काढण्यासाठी दोन महिन्यांची मर्यादा होती, ती आता 12 महिने करण्यात आली आहे. तसेच अंतिम पेन्शन काढण्याची मुदत दोन महिन्यांवरून थेट 36 महिने करण्यात आली आहे. या नव्या सुधारणांमुळे सदस्यांना त्यांच्या निवृत्ती निधी अथवा पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या ईपीएफओ कडून सदस्यांना 8.25 टक्के व्याजदर दिला जातो. लवकरच ईपीएफओ सदस्यांना एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातूनही निधी काढण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पीएफ रक्कम काढण्यासाठी सदस्यांनी ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून ‘ऑनलाइन सेवा’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‘दावा (फॉर्म-31, 19, 10C आणि 10D)’ या पर्यायाची निवड करून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यानंतर तुमचा युएएन शी लिंक असलेला बँक खाते क्रमांक प्रविष्ट करून तपशील सत्यापित करावा. त्यानंतर ‘मी अर्ज करू इच्छित आहे’ या पर्यायावर क्लिक करून नोकरी सोडल्यानंतरचा (फॉर्म 19), पेन्शन काढण्यासाठीचा (फॉर्म 10C) किंवा आंशिक पैसे काढण्यासाठीचा (फॉर्म 31) योग्य पर्याय निवडावा. आवश्यक माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करावा आणि आधार-लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करावा. अर्ज सादर झाल्यानंतर नियोक्त्याकडून मंजुरी मिळाल्यावर रक्कम थेट सदस्याच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केली जाईल.

Local Body Elections : काँग्रेस-राष्ट्रवादी भेटले, शिवसेना वेटिंगवर!

ऑनलाइन पैसे काढण्यासाठी सदस्यांचा युएएन सक्रिय असणे आणि आधारसह केवायसी पूर्ण असणे अत्यावश्यक आहे. सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर (https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login) लॉगिन करून शिल्लक तपासणे. याशिवाय नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 9966044425 या टोल-फ्री क्रमांकावर फोन करून किंवा 7738299899 या क्रमांकावर “EPFOHO UAN” असा मेसेज पाठवूनही शिल्लक रक्कम जाणून घेता येते.

सरकारच्या या निर्णयामुळे लाखो नोकरदारांना दिलासा मिळणार असून तातडीच्या आर्थिक गरजांसाठी त्यांच्या बचतीचा वापर अधिक सोयीस्करपणे करता येणार आहे.