The four-decade political journey from Jan Sangh to BJP has come to an end :जनसंघापासून भाजपपर्यंतचा चार दशकांचा राजकीय प्रवास संपला
Gondia : महाराष्ट्राचे माजी वित्तमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेले प्रा. महादेवराव शिवणकर (वय 87) यांचे सोमवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांनी मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात जलसंपदा मंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
महादेवराव शिवणकर यांचा राजकीय प्रवास जनसंघापासून सुरू झाला आणि पुढे भारतीय जनता पक्षापर्यंत पोहोचला. त्यांनी आपल्या कार्यकाळात संघाच्या विचारसरणीवर आधारित जनसेवा आणि विकासाचे ध्येय ठेवले. गोंदिया जिल्ह्यात पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी अनेक सिंचन प्रकल्प साकारून शेतकऱ्यांना दिलासा दिला. कलपाथरी, बेवारटोला, ओवारा, पुजारीटोला, कालीसरार यांसारखे सिंचन प्रकल्प त्यांच्या प्रयत्नातून उभारले गेले आणि आजही ते शेतकरी विकासात मोलाची भूमिका बजावत आहेत.
Local Body Elections : नेत्यांच्या मागे फिरणाऱ्याला तिकीट नाही, बावनकुळेंनी सुनावले !
महादेवराव शिवणकर हे मूळ शेतकरी असून शिक्षण क्षेत्राशीही त्यांचा घट्ट संबंध होता. त्यांनी एम.ए. अर्थशास्त्र आणि एम.ए. इतिहास अशी दुहेरी पदवी घेतली होती. भवभूती महाविद्यालय, आमगाव येथे ते अर्थशास्त्र आणि इतिहास विषयाचे व्याख्याता म्हणून कार्यरत होते. 26 जून 1975 रोजी आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता.
त्यांचा राजकीय प्रवास जवळपास चार दशकांचा होता. 1978 ते 2008 या काळात ते अनेक निवडणुकांमध्ये अजिंक्य राहिले. ते 1978, 1980, 1985, 1995 आणि 1999 मध्ये आमगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 1989 ते 1994 आणि पुन्हा 2004 ते 2008 या काळात त्यांनी चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.
Sudhir Mungantiwar : उमरी पोतदार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण
मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी 1995 ते 1997 या काळात जलसंपदा मंत्री, तर 1997 ते 1999 दरम्यान वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात विकास, सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
माजी खासदार म्हणून त्यांनी संसदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना “भारतरत्न” देण्याची मागणी सर्वप्रथम मांडली होती. त्यांच्या या पुढाकाराचे देशभर कौतुक झाले होते.
Sadavarte Vs Raj Thackeray : टन टन टोल झालं, भोंगे झाले आता…
त्यांच्या निधनाने भाजप आणि संघ परिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे मुलगा आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, संजय शिवणकर यांच्यासह मोठा परिवार आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महादेवराव शिवणकर हे एक सुसंस्कृत, शिस्तप्रिय आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी, संयमी आणि विचारवंत व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
_____