BJP’s focus on vanchit bahujan aghadi constituencies : सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार मोहीम
Akola : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अकोला जिल्हा परिषद ‘वंचित बहुजन आघाडी’च्या ताब्यातून काढून घेणे हे भाजपसमोरचे मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे. गेल्या तीन दशकांपासून जिल्हा परिषदेत वंचितचे वर्चस्व कायम असून यावेळी भाजपने सत्ता हस्तगत करण्यासाठी सर्वतोपरी तयारी सुरू केली आहे.
भाजपकडे सध्या एक खासदार आणि तीन आमदारांचे बळ आहे. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे आणि हरीष पिंपेळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत भगवा फडकावण्यासाठी भाजपने जोरदार मोहीम हाती घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेने (शिंदे गट) चे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, नारायण गव्हाणकर, माजी जि.प. सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी हेही महायुतीसोबत कार्यरत असल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होताना दिसत आहे.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या
महिलांचे वाढते वर्चस्व
या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यापैकी अध्यक्षपद अनुसूचित जमाती राखीव आहे. पाच जागा अ.ज.साठी राखीव असून, त्यापैकी तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपद या तीन गटापैकी एका महिला सदस्याला मिळणार असल्याने या गटात चांगलीच चूरस बघायला मिळण्याची शक्यता आहे.
वंचितचे पारंपरिक बालेकिल्ले
गेल्या सुमारे तीन दशकांपासून वंचित बहुजन आघाडीचा अकोला जिल्हा परिषदेत ठसा उमटलेला आहे. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने २३ जागा जिंकून पहिला क्रमांक पटकावला होता. मात्र, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पराभवानंतर वंचितची पकड थोडी सैल झाल्याचे दिसते. याशिवाय, पक्षातील काही प्रमुख नेते अलीकडेच इतर पक्षात गेले असल्याने संघटनात्मक ताकद किंचित कमी झाल्याचे जाणवते.
विरोधी पक्षांची स्थिती
काँग्रेसकडे सध्या आमदार साजिद खान यांच्याशिवाय विशेष प्रभावी नेतृत्व नाही. तथापि, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील धाबेकर आणिमाजी आमदार नातिकोद्दीन खतीब हे वंचितसोबत सक्रिय असल्याने स्थानिक पातळीवर संधी निर्माण होऊ शकते.
शिवसेने (उद्धव ठाकरे गट) कडून आमदार नितीन देशमुख, माजी आमदार हरिदास भदे आणि जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखाली संघटन बळकटीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
Vidarbha Farmers : ३३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, अहवाल पाठवून एक महिना झाला!
निवडणूक रंगणार चुरशीची
अकोला जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून पडद्यामागील चर्चांना उधाण आले आहे. वंचितकडून “इनकमींग होणारच” असा आत्मविश्वासपूर्ण दावा केला जात आहे, तर भाजपकडून जिल्हा परिषदेत भगवा फडकविण्याची तयारी जोमात आहे. त्यामुळे येत्या काळात अकोल्यातील राजकीय फटाके कधीही फुटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. ओबीसी आरक्षण हा या निवडणुकीत प्रमुख मुद्दा राहणार आहे.








