Local Body Elections : सत्ता, संघर्ष आणि रणनीतींचा खेळ,नागपूरच्या राजकारणात ताप वाढतोय!

Power, conflict and the game of strategy,Nagpur’s political battlefield is heating up : प्रमुख राजकीय पक्षांमध्ये सत्तेच्या लढाईला सुरूवात

Nagpur :दिवाळीचा उत्सव ओसरला आहे, पण शहर अजूनही दिपमाळांच्या झगमगाटाने उजळून निघालं आहे. हवेत गारवा असला, तरी नागपूरचं राजकीय वातावरण मात्र प्रचंड तापलेलं आहे. कारण यंदा नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जवळ आली आहे. शहरातील राजकीय समीकरणं नव्याने मांडली जात आहेत, जुनी मैत्री आणि नवे गठबंधन यांचा तौलनिक खेळ रंगू लागला आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या रणनीतीने मैदानात उतरण्याची तयारी करत आहे आणि त्यामुळे ‘ओरेंज सिटी’चं राजकारण सध्या अक्षरशः उकळत्या टप्प्यावर आलं आहे.

शहरातील नागरिक अजूनही दिवाळीच्या गोड आठवणींमध्ये रमलेले आहेत. अशात सर्व राजकीय पक्ष मात्र रणांगणात उतरण्याच्या तयारीत गुंतले आहेत. नागपूर महानगरपालिकेवर आपली सत्ता टिकवण्यासाठी भाजपने मिशन मोडमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) एकजुटीने लढण्याची तयारी कमीच दिसत आहे. पण यावेळी एकजुट दाखवली नाही, तर त्यांची दाणादाण उडू शकते, अशी परिस्थिती आहे.

Doctor suicide case : रात्री उशिरा शरणागती, कसून चौकशी सुरू

भाजपकडून विविध विभागांत कार्यकर्त्यांच्या बैठकांना वेग आला आहे. विकास हा मुख्य मुद्दा ठरवून मतदारांना आकर्षीत करण्याचा नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. मोदी आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचा विकास वेगाने झाला, असा दावा भाजप नेते करत आहेत. मात्र विरोधक यावर विश्वास ठेवायला तयार नसून आरोपांच्या फैरी झाडत भाजपवर तुटून पडले आहेत.

MLA Chainsukh Sancheti : आमदार संचेतींच्या निवासस्थानासमोर झुणका-भाकर आंदोलन

काँग्रेसकडून शहरातील वाढता भ्रष्टाचार, अपूर्ण सुविधा आणि महागाई हे मुद्दे उचलून भाजपला घेरण्याचा प्रयत्न होत आहे. पदाधिकारी,वरिष्ठ नेते विभागनिहाय सभा घेत जनतेशी थेट संवाद साधत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गट शहरात आपली ताकद कुठे आहे, याचा शोध घेताना दिसत आहे. आपली ताकद दाखवण्यासाठी नव्या पद्धतीने जनसंपर्क मोहिमा राबवत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांमध्येही हालचाली वाढल्या आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोघांच्या भूमिकांकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

SDO Mehkar : ‘पै-पै जमवून घेतलेले प्लॉट आता मातीमोल ठरत आहेत, आमचा गुन्हा काय?’

नागरिकांच्या दृष्टीने मात्र मुख्य प्रश्न वेगळे आहेत. पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन योग्य रितीने होत नाही. राजकारणी भांडतात, पण आमचं शहर काही बदलत नाही, अशी नागरिकांची ओरड आहे. सध्याच्या गारव्यातही राजकीय उत्साहाचे तापमान चढले असून प्रत्येक पक्ष, कार्यकर्ता सज्ज झालेला दिसतोय. दिवाळीनंतर हवेत गारवा असला तरी राजकारणात मात्र तापमान वाढले आहे.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.