Shivsena Confident of Winning Mehkar Municipal Council : मेहकर नगरपालिका जिंकण्याचा शिवसेनेला विश्वास
Mehkar केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी इच्छुक उमेदवारांची अलीकडेच बैठक घेतली. यात सर्वांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मात्र, अद्याप आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कुणी कामाला लागायचे आणि कुणी नाही, याचीच जोरदार चर्चा मेहकर तालुक्यात सुरू आहे.
मेहकर आणि लोणार तालुक्याचा विकास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मेहकर नगरपालिकेवर शिवसेना-भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकविणे आवश्यक आहे, असे जाधव इच्छुक उमेदवारांना म्हणाले. प्रत्यक्षात मात्र उपस्थितांपैकी किती लोकांना उमेदवारी मिळणार, यावरच सारे गणीत अवलंबून आहे असे दिसते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय रायमूलकर होते.
Local Body Elections : भाजपमध्ये ‘इनकमिंग’ वाढले, महायुतीला काय फायदा?
जाधव म्हणाले, “केंद्रात आणि राज्यात आपले सरकार असल्याने मेहकर-लोणार तालुक्याला विकासाच्या दृष्टीने मोठा लाभ मिळाला आहे. हा विकासाचा प्रवाह सातत्याने सुरू राहावा, यासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे मैदानात उतरावे.”
ते पुढे म्हणाले, *“उमेदवाराची जनमानसातील प्रतिमा, लोकसंपर्क आणि जनसेवेतील योगदान हाच विजयाचा पाया असतो. माजी आमदार रायमूलकर आणि माझ्या माध्यमातून महायुती सरकारने मेहकर मतदारसंघात तब्बल ५,००० कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी आणला. परंतु विद्यमान आमदाराने मागील ११ महिन्यांत *एक रुपयाचेही काम मंजूर केलेले नाही.”
माजी आमदार संजय रायमूलकर म्हणाले, “मेहकर अर्बन बँक नफ्यात असताना ती विरोधी पक्षाच्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आली. त्याने ती बँक बुडवली असून तिचे विलीनीकरण नागपूरच्या बँकेत होत आहे. यामागे विद्यमान आमदारांचा हात असून, ते मिळून मेहकरमधील शेकडो कोटी रुपयांची जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत.”








