Battle for political credit on Swati Industries : शिवसेना उद्धव गटाने फटाके फोडून केले स्वागत
Akola महानगरपालिकेचा स्वाती इंडस्ट्रीजसोबतचा करार रद्द केल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब टाकरे गटाने 1 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता महापालिका आवारात फटाके फोडले. आनंद साजरा करताना त्यांनी अधिकाऱ्यांचा सत्कारही केला. करावरील शास्ती माफ करण्याचीही मागणी यावेळी केली. स्वाती कंपनीचा करार रद्द करण्याचे क्षेय घेण्यात आता राजकीय पक्षात चढाओढ सुरू झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने हा करार आमच्यामुळे रद्द झाल्याचा दावा केला आहे.
Shivsena उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख माजी नगरसेवक राजेश मिश्रा व शिवसैनिकांनी स्वाती कंपनीसोबत केलेला करार हा अवैध आहे. कंपनीला कर वसुलीनुसार देण्यात येणारे कमिशन चुकीचे आहे. त्यामुळे हा करार रद्द करावा, या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली, स्वाक्षरी अभियान चालविले. त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी वसुली समाधानकारक नसल्याने स्वाती कंपनीसोबतचा करार रद्द केला. या निर्णयाचे स्वागत करीत उद्धवसेनेने मनपा आवारात फटाके फोडले.
उपायुक्त गीता ठाकरे, कर अधीक्षक विजय पारतवार यांचा सत्कार करीत, मार्च 2025 पर्यंत कर वसुलीवर शास्ती माफ करण्याची योजना सुरू करण्याची राजेश मिश्रा यांनी मागणी केली. यावेळी तरुण बगेरे, मंगेश काळे, सुरेंद्र विसपुते, अनिल परचुरे, अंकुश शिंत्रे, प्रकाश वानखडे, रुपेश ढोरे, अविनाश मोरे, बाळू पाटील, संजय फुललेलू, गणेश बुंदेले, गोपाल लव्हाळे, नितीन देशमुख, शैलेश अंदुरेकर, रोशन राज, देवा गावंडे, पंकज बाजोड, विजय तिखिले, राजेश कानापुरे, मंगेश पावले, योगेश गिते आदी उपस्थित होते.
भाजपची चुप्पी
स्वाती कंपनीचा करार रद्द झाल्यानंतर या प्रकरणात भाजपने चुप्पी साधली आहे. यापूर्वी स्वाती कंपनीसोबत मनपाने करार केला तेव्हा भाजपचे यात साटेलोटे असल्याचा आरोप वंचित व शिवेसनेतर्फे करण्यात आला होता. आता करार रद्द झाल्यानंतर भाजपने साधलेल्या चुप्पीने या आरोपाला बळ मिळाले आहे.