CM Devendra Fadnavis gave the guardianship of Amravati to Revenue Minister : फडणविसांनी बावनकुळेंकडे दिले अमरावतीचे पालकत्व
Amravati नागपूरचे पालकत्व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे सोपवले जाणार हे निश्चितच होते. पण अमरावतीबद्दल कमालीची उत्सुकता होती. कारण अमरावती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामांचे गाव म्हणून ओळखले जाते. मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांच्यावर नागपूरसह अमरावतीचीही जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे बावनकुळे यांच्या ओठी सध्या ‘मुख्यमंत्र्यांच्या मामाच्या गावाला जाऊया’ असे गाणे असेल तर त्यात नवल वाटायला नको.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकत्व भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रिमंडळातील विश्वासू सहकारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविले आहे. यापूर्वी हा पदभार स्वतः फडणवीस यांनी सांभाळला होता. नंतर त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिली होती. मुख्यमंत्र्यांचे आणि अमरावती जिल्ह्याचे खास भावनिक संबंध आहेत. आता त्यांच्या मामांच्या जिल्ह्याला नव्या नेतृत्वाची साथ मिळणार आहे.
Eknath Shinde : ‘स्वामित्व’ सरकारी योजना नव्हे, तर ग्रामविकासाची चळवळ !
चंद्रशेखखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांच्यावर नागपूरसह अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांचा अमरावती जिल्ह्याशी खास नातेसंबंध
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मामांचे गाव अमरावती जिल्ह्यात आहे. त्यांच्या आई सरिताताई फडणवीस यांचे माहेर बालाजी प्लॉट, अमरावती येथील आहे. लहानपणापासून दर उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये फडणवीस मामाच्या गावी येत असत. चिखलदऱ्यातही त्यांच्या नातेवाईकांचे घर आहे. ज्यामुळे फडणवीस यांचे या जिल्ह्याशी भावनिक नातं आहे.
भाजपमधील मतभेदांवर पडणार पडदा?
अमरावती जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत मतभेद आहेत. या मतभेदांवर बावनकुळे यांच्या नेतृत्वामुळे पडदा पडेल, अशी अपेक्षा केली जात आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे आणि त्यांच्या विरोधकांमध्ये असलेले वाद. तसेच आमदार रवी राणा यांना पाठिंबा देण्याबाबत झालेल्या मतभेदांमुळे पक्षात तणाव निर्माण झाला होता. बावनकुळे यांच्या नियुक्तीमुळे भाजप एकजुटीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
Nitin Gadkari : नागपुरात सुरू होणार इलेक्ट्रिक बस तयार करणारी कंपनी
निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होणार
अमरावतीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका येत्या काळात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या नेतृत्वामुळे भाजपला या निवडणुकांमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.