Watch on the pending projects in Nagpur : नागपुरातील प्रलंबित प्रकल्पांवर राहणार वॉच
Nagpur नागपुरातील प्रलंबित विकासप्रकल्पांना आता गती मिळण्याचे संकेत आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांचे सर्व प्रकल्पांवर बारीक लक्ष राहणार आहे. उपराजधानीत साकारत असलेले विविध प्रकल्प जलगतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वॉर रुम सज्ज झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार मुंबईच्या धर्तीवर नागपूर येथेही वॉर रूम गठीत करण्यात आली आहे. याचा पाठपुरावा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प नागपुरात साकारत आहेत. यातून रोजगार निर्मितीसह आर्थिक विकासाला मोठे बळ प्राप्त होणार आहे. हे प्रकल्प जलदगतीने प्रत्यक्षात साकारण्यासाठी संबंधित विभागांचा समन्वय व विविध शासकीय जबाबदारी वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.
यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरचा अनुभव लक्षात घेता सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे वॅार रूमसंदर्भात एक व्यापक आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्तावित विकासकामे व योजनांबाबत संबंधित कार्यान्वयन विभागांना विहित प्रपत्र देण्यात येणार आहेत. त्या-त्या विभागांना त्यानुसार संबंधित प्रकल्पांची माहिती विहित प्रपत्रात भरावी लागणार आहे. या माहितीचा आढावा प्रत्येक टप्प्यावर घेण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास स्वतंत्र याबाबत पोर्टल विकसित करण्यात येईल.
सद्यस्थितीत जर एनआयसीकडे एखादे पोर्टल वापरता असेल तर त्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या. यासाठी निश्चित कार्यपद्धती दोन दिवसांमध्ये ठरविण्यात येऊन ती संबंधित विभागप्रमुखांना पाठविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले.