Municipal Corporation collecting tax in police protection : पाचही झोनमध्ये कार्यवाही, थेट घरी पोहोचतेय पथक
Amravati मालमत्ता कराच्या वसुलीसाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. सोमवार, १७ फेब्रुवारीपासून मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली. पाचही झोननिहाय पथके ही कारवाई करीत आहेत. सहायक आयुक्तांच्या नियंत्रणात ही पथके थेट थकीत करधारकांच्या घरी पोहोचून जप्ती प्रक्रिया राबवत आहे.
महानगरपालिकेने बड्या रकमेच्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी पोलिस मदतीसह ही मोहीम हाती घेतली आहे. काही दिवसांपासून कर वसुलीसाठी विविध उपाययोजना केल्या जात असूनही मोठ्या थकबाकीदारांनी कर भरण्यास पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे आता थेट जप्ती कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Traffic Police RTO : देशभरात कुठेही जा! या वाहनांना कोणी अडवत नाही!
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा कर भरण्यासाठी ३१ मार्च २०२५ ही अंतिम मुदत आहे. यापूर्वी कर न भरल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विभागीय (वॉर्ड) कार्यालये तसेच नागरी सुविधा केंद्रे सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत.
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे यासाठी शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. ऑटो रिक्षातून ध्वनिक्षेपणाद्वारे जनजागृती केली जात असून, ‘कर लिपिक नागरिकांच्या दारी’ हा उपक्रमही सुरू आहे.
महानगरपालिकेच्या पाचही झोननिहाय पथके थकीत मालमत्ता धारकांच्या घरी थेट जाऊन जप्ती प्रक्रिया राबवतील. त्यांच्यासोबत पोलिस बंदोबस्त राहणार आहे. बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे, असे महापालिका आयुक्त सचिन कलंगे यांनी सांगितले.
८४ शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. ३८६९ मालमत्ता धारकांना जप्ती नोटीस बजावण्यात आली आहे. १३४३ मालमत्ताधारकांची जप्ती प्रक्रिया सुरू होणार आहे. १८८ कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य असून, ३१ मार्च २०२५ पूर्वी ही रक्कम तिजोरीत जमा करणे आव्हानात्मक ठरणार आहे.