Water shortage for almost five years, villagers suffer : नागरिकांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा, प्रशासनाला अल्टीमेटम
Buldhana सिंदखेडराजा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गटग्रामपंचायत लिंगा (काटे पांगरी) येथील नागरिक पाण्यासाठी अद्यापही वणवण फिरत आहेत. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणण्याची वेळ येत आहे. लाेकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे पाच वर्षापासून पाणीटंचाई कायम आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी भर उन्हात भटकंती हाेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे,गावातील पाणीटंचाई आता ऐरणीवर आली आहे. परिणामी राजकारण पेटण्याची शक्यता आहे.
गेल्या काही वर्षांत ‘जल जीवन योजना’ अंतर्गत लिंगा गावासाठी पाईपलाईन आणि नळयोजनेसाठी मंजुरी देण्यात आली. मात्र, हे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेतच आहे. गावकऱ्यांनी अनेकदा याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
पाणीटंचाईमुळे महिलांना होणाऱ्या हालअपेष्टांना वाचा फोडण्यासाठी २७ जानेवारी २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांनी ‘घागर मोर्चा’ काढला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
मधुकर आसाराम भालेराव, संजय गोविंदा मानवतकर, गीताबाई संतोष खंदारे, किशोर बापूराव मानकर यांसह ३९ ग्रामस्थ आणि महिलांनी निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.
Forest Department : एक वर्षाच्या बिबट्याला वन विभागाकडून जीवदान!
ग्रामपंचायत अधिकारी के. के. म्हसके यांनी सांगितले की, “मी चार महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला असून गावातील पाणीटंचाई गंभीर आहे. ठेकेदाराशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.” ग्रामस्थांच्या संतापाचा आता प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा अधिक मोठ्या आंदोलनाची शक्यता नाकारता येणार नाही.