The road near Namdev Kirsan’s house was dug up, but the MP remained silent : केव्हाही होऊ शकतो लोकांच्या संतापाचा उद्रेक
Gondia : आमगाव-देवरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 चे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. अनेक ठिकाणी पॅचवर्क आणि बांधकाम अपूर्ण आहे. विशेषतः आमगाव शहराजवळ कालव्याजवळ खोदून ठेवलेला रस्ता वाहतुकीस अडथळा ठरत आहे. अनेकदा अपघात होऊनही प्रशासन आणि बांधकाम कंपनी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतापले आहेत. लोकांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
या रस्त्याच्या अवघ्या 200 मीटर अंतरावरच गडचिरोली-चिमूरचे मतदारसंघाचे खासदार नामदेवराव किरसान यांचे घर आहे. बऱ्याचदा त्यांचा याच रस्त्यावरून प्रवास होतो. मात्र नागरिकांच्या या समस्येकडे त्यांनी अजूनही लक्ष दिलेले नाही. जेथे लोकप्रतिनिधी राहतात, तिथेच रस्ता खराब अवस्थेत असताना कोणीही लक्ष देत नसेल, तर सामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अपघात नित्याचेच..
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अनेक विद्यार्थी, कामगार, व्यापारी आणि वाहनधारक रोज प्रवास करतात. मात्र, खराब रस्ता आणि उघड्यावर ठेवलेले खोदकाम यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचे नुकसान होत असून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह..
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी अनेकदा केली असली तरी प्रशासन आणि बांधकाम कंपनी कोणतीही ठोस कारवाई करत नाही. लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
खासदार नामदेवराव किरसान आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी चेतावणी नागरिकांनी दिली आहे.