Family members of Somnath Suryavanshi met Prakash Ambedkar in Akola : शासन, प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याची खंत
Akola परभणी येथे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानशिल्पाची तोडफोड झाली. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (दि.५ जानेवारी) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. अकोल्यात ही भेट झाली. या प्रकरणात पोलिस आणि शासन न्याय देत नसल्याचा आरोप करीत कुटुंबियांनी केला. तसेच आंबेडकर यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी, मावशी व त्यांचे पती तेजश्री विटकर व दिगंबर विटकर यांनी अकोल्यातील यशवंत भवन येथे आंबेडकर यांची भेट घेतली. पोलिस व शासन न्याय देत नाही, असा आरोप करीत, आमचा आपल्यावरच विश्वास असून, आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी ॲड. आंबेडकर यांच्याकडे यावेळी केली.
आरोपींना शिक्षा व्हावी; आम्हाला न्याय मिळावा
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या आरोपींना शिक्षा व्हावी. आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती करण्यासाठी आम्ही ॲड. प्रकाश आंबेडकर यांना भेटण्यासाठी आलो होतो. ते आम्हाला न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली.
आठवलेंनीही केले होते आरोप
आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या अमानूष मारहाणीमुळेच मृत्यू झाला आहे. पोलीस कोठडीमध्येच त्यांची हत्या झाली आहे, असा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी (५ जानेवारी) केला. सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठलाही आजार नव्हता. पोलिसांच्या बेछुट मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आजार असल्याचा बनाव पोलीस करीत आहेत. सर्व पक्षांनी याविराेधात आंदोलन करायला हवे होते. परंतु तसे झाले नाही, असंही आठवले म्हणाले होते.