Policeman’s body found in locked car : गिरोली येथे गळा आवळून हत्या; चाैघांना अटक
Buldhana जालना जिल्हा पोलीस दलाच्या महामार्ग विभागात कार्यरत असलेले ज्ञानेश्वर पांडुरंग म्हस्के (वय ३८, रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात दिवसांत पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अनैतिक संबधांतून ही हत्या करण्यात आल्याचे पाेलीस तपासात समाेर आले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी चार जणांना अटक केली आहे. गुढीपाडवा सणानिमित्त शनिवारी (२९ मार्च) मृतक म्हस्के हे आपल्या मूळ गावी गिरोली येथे आले होते. कामानिमित्त देऊळगाव राजा येथे गेलेल्या म्हस्के हे रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने वारंवार फोन केला. प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना याची माहिती दिली.
Vidarbha Farmers : शासनाची सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांसाठी आहे का?
पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रेस केले असता, सिंदखेडराजा रोडवरील आर. जे. इंटरनॅशनल स्कूलसमोर वन विभागाच्या हद्दीत त्यांची कार (एमएच २० डीवाय ३०६३) उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, कार आतून बंद होती. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर म्हस्के यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गळा आवळल्याच्या खुणा दिसून आल्या.
२३ मार्च रोजी अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीचा पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या सात दिवसांतच दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाेलीस कर्मचारी ज्ञानेश्वर म्हस्के यांच्या पत्नीबराेबर आराेपी माजी सरपंचपती बाबासाहेब म्हस्के याचे अनैतिक संबध हाेते. या अनैतिक संबधात अडथळा आणत असल्याने बाबासाहेब म्हस्के याने आपला जवळचा मित्र असलेल्या ज्ञानेश्वर म्हस्के याची पाच ते सहा लाख रुपयात सुपारी दिली हाेती़ त्यातूनच ही हत्या करण्यात आली.
आराेपींमध्ये बाबासाहेब श्यामराव म्हस्के (वय ३८, रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा), कमलाकर पंडितराव वाघ (वय ४४), बडतर्फ पोलिस अंमलदार दिलीप बाजीराव वाघ (वय ५२), आणि बबन संपत शिंदे (वय ३८, रा. बंजार उम्रद, जि. जालना) यांचा समावेश आहे. दिलीप वाघ हा छत्रपती संभाजी नगर येथे पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत होता. एका गुन्ह्यातील सहभागामुळे त्याच्यावर पोलिस दलातून बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.