Immediately assess the damage caused by unseasonal rains : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे निवेदन
Buldhana गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केली आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पक्षाचे जिल्हा संघटक प्रा. डी. एस. लहाने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात घाटमाथा व घाटाखालच्या भागांतील अनेक गावांमध्ये गहू, ज्वारी, मका, कांदा बियाणे, चिया यांसारख्या रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे पपई, आंबा व लिंबूवर्गीय फळबागांचे झाडे उन्मळून पडले असून फळउत्पादनाचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे पशुधनही या पावसामुळे बाधित झाले आहे. गतवर्षीच्या पीक विम्याच्या विलंबित मिळकतीमुळे व खरीप उत्पादनाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच अवकाळी पावसाच्या या संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण करून योग्य ते पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना आर्थिक मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी बुधवत यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहम्मद सोफियान, आशिष बाबा खरात, एकनाथ कोरडे, युवासेना शहरप्रमुख अनिकेत गवळी, राहुल जाधव, सागर हिवाळे, किशोर सुरडकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.